अहिल्यानगर : जिल्ह्यात ९४ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी होते. परंतु कृषी सेवा केंद्र चालकांकडून युरिया खतासोबत अन्य १९/१९/१९ हे नत्र, स्फूरद व पालश असलेले खत व मायक्रोन्यूटन खते घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे कृषी केंद्र चालकांकडून लूट होत आहे. यावर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ७ लाख १६ हजार हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख ६९ हजार हेक्टरवर म्हणजे ९३.४१ टक्के पेरणी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात १२४ मिमी पाऊस झाला असून पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकरी खरीप पिकांसाठी युरिया खतांची मागणी करताना दिसत आहेत.

परंतु अनेक कृषी सेवा केंद्र चालक युरिया खतांसोबत अन्य खते घेण्याची सक्ती करीत आहेत. तसेच काही ठिकाणी जादा दराने युरिया खतांची विक्री होत आहेत, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. सध्या डीएपी वगळता अन्य खतांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतीचा खर्च वाढला आहे. युरिया खतांसोबत अन्य २०० रुपयांचे नत्र, स्फूरद, पालाश हे १९/१९/१९ हे किलोचे खत घेण्याची सक्ती करतात.
अन्यथा खत दिले जात नाही, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक यांच्यासह प्रत्येक तालुक्यात फक्त एक तालुका गुणनियंत्रण अधिकाऱ्याची यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. लिकिंग अथवा खतांच्या संदर्भात तक्रार याच अधिकाऱ्याकडे करावी लागत आहे. यापूर्वी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याचे अधिकार होते.
परंतु आता तालुका गुणनियंत्रण अधिकाऱ्यांना हे अधिकार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर तालुक्यासह जिल्हाभरातून खताच्या लिकिंगसंदर्भात तक्रारी येत आहेत. यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.