पाथर्डी- तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणाची प्रारुप यादी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने त्याबाबत ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेल्या नाहीत.
मात्र, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामिण भागातील पुढाऱ्यांना आनंद झाला आहे. भालगाव, कासारपिंपळगाव, टाकळीमानूर, मिरी-करंजी, तिसगाव असे पाच जिल्हा परिषदेचे गट आहेत. भालगाव, अकोले, कासारपिंपळगाव, कोरडगाव, टाकळीमानूर, माणिकदौंडी, मिरी, करंजी, तिसगाव व माळीबाभुळगाव असे दहा पंचायत समितीचे गण आहेत. कासारपिंपळगाव गटात २२ ग्रामपंचायतीचे २८ गावे समाविष्ट असून, ४५०२० लोकसंख्या आहे. तिसगाव गटात २१ ग्रामपंचायतीचे २५ गावे समाविष्ट असून, ४६९०५ लोकसंख्या आहे. टाकळीमानुर गटात २४ ग्रामपंचायतीचे ३० गावे समाविष्ट असून, ४७१३३ लोकसंख्या आहे.

मिरी-करंजी गटात २३ ग्रामपंचायतीचे २४ गावे समाविष्ट असून, ४५५९४ लोकसंख्या आहे. भालगाव गटात १८ ग्रामपंचायतीचे २७ गावे समाविष्ट असून, ४६२६६ लोकसंख्या आहे. गट व गणामध्ये कोणताही फरक झालेला नाही. पूर्वी होते तेच कायम राहिले आहेत. तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी प्रारुप यादी प्रसिद्ध केलेली आहे. तरीपण यावर हरकती होऊन नंतर यादी निश्चीत केली जाणार आहे. नागरिक काय हरकती नोंदवतात, का याकडे लक्ष लागले आहे.
बदल झालेला नसल्याने यामध्ये कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. मात्र लोकशाहीत सर्वांना अधिकार असल्यानेकधीही काहीही होऊ शकते. गाव पुढारी मात्र खुश झाले आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळणार हेच महत्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकाच नसल्याने कार्यकर्ते हतबल झाले होते.