जेऊर- अहिल्यानगर तालुक्यात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या चोऱ्यांचे प्रकार घडत असतात. चोरांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेला कसरत करावी लागते. त्यात काही प्रमाणात यश मिळते तर काही गुन्ह्यांचा तपास सुरू राहतो. परंतु तालुक्यातील जेऊर येथे झालेल्या चोरीची गोष्टच ‘न्यारी’ असून चार चाकी वाहन व दोन म्हशींची चोरी करणाऱ्या चोरांची नावे ग्रामस्थांना निष्पन्न झाली आहेत. परंतु संबंधित घटनेबद्दल गुन्हा दाखल नसल्याने त्यांच्यावर पोलीस कारवाई झालेली नाही. सदर ‘अनोख्या’ चोरीच्या घटनेची जेऊर पंचक्रोशीत चांगलीच चर्चा झडत आहे.
तालुक्यातील जेऊर येथून मुख्य गावठाणातूनच बडा दोस्त या चार चाकी मालवाहतूक वाहनाची चोरी १४ जुलै रोजी रात्री झाली होती. त्याच रात्री बहिरवाडी परिसरातील वाकी वस्ती येथून एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून दोन म्हशी देखील चोरीला गेल्या होत्या. सदर गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर सदर गाडी पाथर्डी तालुक्यातील मिरी परिसरात बेवारस अवस्थेत मिळून आल्याने चोरीच्या घटनेबद्दल वाहन मालकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

तर म्हशी चोरीला गेलेल्या शेतकऱ्याने देखील पोलिसांची झंझट नको म्हणून गुन्हा दाखल न करता एमआयडीसी पोलीस स्टेशनला साधा अर्ज दिला आहे. पंधरा दिवस उलटल्यानंतर आपापसातच पैशांच्या वाटणीवरून वाद झाले आणि सदर चोरीचा भांडाफोड झाला. वाहन व म्हशीच्या चोरी प्रकरणात सक्रिय असणाऱ्या एकाने घडलेली सर्व हाकिकत दारूच्या नशेत उघड केली. त्यामुळे सदर चोरी मधील सर्व आरोपींची नावे ग्रामस्थासमोर उजेडात आली. आरोपींची नावे समजताच सर्वच ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का धक्का बसला.
तसेच नागरिकांमधून तीव्र संताप देखील व्यक्त करण्यात आला. वाहन व म्हशी चोर गावातीलच असल्याने गावामध्ये विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज टाळत त्यांनी प्रवास केला. परंतु पैशाच्या वाटणीवरून झालेल्या वादामुळे चोरीचा भांडाफोड झाला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल नसल्याने आरोपींवर कारवाई झाली नसली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
यापूर्वी गावात अनेक भुरट्या चोऱ्या झालेल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास आणि गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
चोरीचा माल घेणाऱ्यावर कारवाई करा !
ऑनलाइन गेमच्या नादात तसेच नशेसाठी, जुगारीसाठी तरुण पिढी गुन्हेगारी कडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्याकडून चोऱ्या करण्याचे सत्र सुरू झाले असून चोरीचा माल घेणाऱ्यांवर देखील कारवाई करावी. म्हशी तसेच चार चाकी वाहन चोरणाऱ्यांची नावे उघड झाली असली तरी म्हशी विकत घेणारे मात्र मोकाट आहेत. चोरीच्या म्हशी घेणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जगतगुरु श्रेष्ठ संत ‘तुकाराम’ महाराजांनी चोरी, लबाडी करणे पाप असल्याचे अभंगातून सांगितले आहे. पण ते आजच्या काही तरुणांना रुचत नाही असे दिसून येते. जेऊर परिसरात ‘प्रशांत’ महासागराप्रमाणे विस्तारलेल्या ओसाड वाड्या वस्त्यांवर चोऱ्या करणाऱ्या काळू- ‘बालु’ च्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. ‘मुक्या’ बापांची लेकरे विविध क्षेत्रात प्रथम येऊन यश मिळवत ‘प्रथमेश’ होण्याऐवजी ‘भैय्या’ बनवू पाहत आहेत हे दुर्दैव आहे. चोऱ्या करणाऱ्या ‘भैय्यांची’ संख्या वाढली असून वेळीच त्यांना आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.