चांदा- नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव परिसरातील डाळिंबाच्या बागांकडे आता चोरट्यांच्या नजरा पडू लागल्याने शेतकऱ्यांना आता रात्रीचा पहारा सुरू केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाळस पिंपळगाव हा परिसर बागायती क्षेत्र म्हणून तालुक्यात ओळखला जातो. या बागायती पट्टयामध्ये अनेक शेतकऱ्यांचा डाळिंबाचे उत्पादन घेण्याकडे कल आहे. झाडाला चांगले फळ येण्यासाठी महागडी औषध फवारणी, किटकनाशके, खते डाळिंब उत्पादक शेतकरी वापरतात.

त्यासाठी वेळप्रसंगी शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊन पैसे उपलब्ध करावे लागतात. कसेबसे डाळिंबाचे पीक जोमात येण्यास सुरुवात झाली तर आता चोरट्यांच्या नजरा ड्रोन कॅमेराच्या साह्याने रात्रीच्या वेळेस या डाळिंबावर पडू लागल्या. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी चोरट्यांच्या धास्तीने रात्रीची गस्त सुरू केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
हे ड्रोन कोठून येते याचा शोध संबंधित पोलीस विभागाने घ्यावा, अशीही मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. रात्रीची गस्त या भागात पोलिसांनी सुरू करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
चोरांनी ठोकली धूम
डाळिंबाच्या बागेकडे सलग दोन दिवसांपासून ड्रोन फिरत असून दुसऱ्या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये अंदाजे आठ ते दहा चोरटे डाळिंब चोरीच्या उद्देशाने आले; परंतु शेतकरी डाळिंबाच्या बागेला पहारा देत असल्याचे लक्षात येताच या चोरट्यांनी धूम ठोकली. या घटनेबाबत शिंगणापूर पोलीस स्टेशनला कळविले असता पोलीस तिकडे फिरकलेच नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.