पारनेर- पारनेर शहरातील कावरे वस्तीवरील निवृत्त जवानाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा तोळे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख, असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लांबवला. पारनेर – सुपे रस्त्यावरील पठारे मळ्यातील शेवूबाई पठारे या ९० वर्षांच्या वृध्देच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची पोत तसेच पाच ग्रॅम वजनाची कर्णफुले ओरबाडून नेली.
त्यांच्याजवळील अडीच हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. चोरट्यांना विरोध करणाऱ्या शेवूबाईंना बेदम मारहाण केली. कर्णफुले ओरबडल्याने त्यांच्या कानाच्या पाळ्या तुटल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मंगळवारी (१५ जुलै) मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान पारनेर शहराच्या पूर्व व दक्षिण भागात चोरट्यांचा दोन तास धुमाकूळ सुरू होता.

मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पठारे वस्तीवरील शेवूबाई पठारे यांच्या घराचा दरवाजा कटावनीने उचकटला. घरात एकट्या झोपलेल्या शेवूबाईंना बेदम मारहाण करीत त्यांचे दागिने व रोख रक्कम लांबवली. जाताना चोरट्यांनी दरवाजाची कडी बाहेरून लाऊन घेतली. शेजारच्या काही घरांच्या कड्याही चोरट्यांनी बाहेरून लाऊन घेतल्या होत्या.
पठारे वस्तीवरील चोरी नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तेथून १ किलोमीटर अंतरावरील कावरे वस्तीकडे वळवला. तेथे सैन्यदलातील निवृत्त जवान सुहास कावरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने व २५ हजार रुपयांची रक्कम लांबवली. कावरे सध्या बेंगळुरू येथे अग्निशमन विभागाच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यांच्या पत्नी रोहिणी कावरे सध्या पारनेर येथील घरी रहात आहेत. मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपल्यावर रोहिणी
कावरे खोलीला कुलूप लावून तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली. सकाळी उठल्यावर चोरी झाल्याचे रोहिणी कावरे यांच्या लक्षात आले. रोहिणी कावरे तसेच अर्जुन पठारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, चोरीच्या घटनांची माहिती कळाल्यावर पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक समीर बारवकर – यांनी दोन्ही ठिकाणी भेट दिली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. पठारे वस्तीवर श्वान जागीच घुटमळले तर कावरे वस्तीच्या मागील डोंगरापर्यंत श्वानाने चोरट्यांचा माग काढला. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळांवरून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला.