राहाता- तालुक्यातील खडकेवाके गावात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या केल्या. यामध्ये वाल्मिक अर्जुन लावरे यांच्या घरातून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. उर्वरित तीन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नसले, तरी त्यांनी उचकापाचक केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की चोरट्यांनी वाल्मिक अर्जुन लावरे, रावसाहेब तुकाराम लावरे, सोमनाथ रावसाहेब मुरादे आणि जालिंदर किसन मुरादे यांच्या घरी धाड घातली. वाल्मिक अर्जुन लावरे यांच्या घरातील लोखंडी कपाट तोडून त्यामधून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. इतर ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र फारसे काही हाती लागले नाही.

रावसाहेब तुकाराम लावरे यांच्या घरात घुसून उचकापाचक करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या मुरादे यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले. मात्र दरम्यान गावातील काही नागरिक जागे झाल्याने चोरटे पसार झाले.
चोरीची माहिती मिळाल्यानंतर गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे यांनी राहाता पोलीस स्टेशनला कळवले. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांच्या सहाय्याने तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीनंतर पहाटे तीनच्या सुमारास चोरी झाली असल्याचे उघड झाले आहे. काही घरांमध्ये कोणी नव्हते, त्यामुळे चोरट्यांना अडथळा झाला नाही.
नागरिकांनी सावध राहावे
घटनेनंतर माजी सरपंच सचिन मुरादे यांनी गावातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना किंवा गावातील प्रमुख व्यक्तींशी संपर्क साधावा. मौल्यवान दागिने, रोख रक्कम घरी न ठेवता सुरक्षित ठिकाणी ठेवावी. रात्री काही संशयास्पद हालचाल आढळल्यास वाड्यावर किंवा शेजाऱ्यांना जागृत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.