राहुरी शहरातील भर बाजारपेठेतील सोन्याच्या दुकाने चोरट्यांनी फोडले, ५० लाखांचा ऐवज केला लंपास

Published on -

राहुरी शहर- चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी काल सोमवारी दि. १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र भन्साळी यांच्या वर्धमान ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात चोरी केली. यात सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राजेंद्र सुरजमल भन्साळी यांचे जुनीपेठ येथील राहुरी मेडिकलसमोर वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोने व चांदीचे दुकान असून, ते रविवार दि. १३ जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेले होते. काल सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुकानाचे शटर थोडेसे उघडे असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी दि. १४ जुलै २०२५ रोजी पहाटे अडीच वाजता प्रथम दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे फवारून दृश्य झाकले. त्यानंतर शटरचे कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला.

दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी उचकापाचक करत ड्रॉवरमधून सुमारे २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने व अंदाजे २५ किलो चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआरही घेऊन ते पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जिल्हा पोलीस प्रमुख दिनेश आहेर, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिंगारदे, रमीजराजा आतार, राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार विजय नवले, प्रमोद ढाकणे, संदीप ठाणगे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी केली. यानंतर अहिल्यानगर येथील ठसेतज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.

आरोपींचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र, सीमा नामक श्वान घटनास्थळीच घुटमळले, ज्यामुळे तपासात काहीसा अडथळा निर्माण झाला.

या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपूरे, तनपूरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपूरे, संचालक हर्ष तनपूरे, काँग्रेस नेते चाचा तनपूरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भूजाडी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, संजीव उदावंत यांच्यासह अनेक व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी व्यापाऱ्यांना आपल्या दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले.

तथापि, या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. युवा नेते हर्ष तनपुरे व संजीव उदावंत यांनीही या घटनेचा निषेध केला.

शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दरोडा टाकून सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. मागील आठवड्यातही दिलीप दरक यांच्या मुलाजवळील अडीच लाखांची बॅग चोरीला गेली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपास अपयशी ठरत असून तक्रारी केल्यावर व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो, असा आरोप करण्यात आला आहे. या घटनांचा तपास न लागल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!