तारकपूर येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह १ लाख ५० हजाराचा ऐवज केला लंपास

Published on -

अहिल्यानगर- तारकपूर परिसरातील एक घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे एक लाख ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथे २८ जुलै रोजी रात्री घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत गौरव अल्फ्रेड गमरे (वय ३३, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, ह. रा. लोहगाव, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी हे २८ जुलै रोजी कुटुंबासह पुणे येथे जाण्यासाठी दुपारी घराला कुलूप लावून रवाना झाले. २९ जुलै रोजी सकाळी फिर्यादी यांचे चुलते पीटर जेम्स गमरे यांनी फोन करून कळविले की, घराचे तीन दरवाजे तोडलेले असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे.

ही माहिती मिळाल्याने फिर्यादी पुण्यावरून तातडीने तारकपूर येथील घरी परत आले. त्यांनी पाहणी केली असता घराचे तीन दरवाजाचे कडीकुलूप तुटलेले दिसले. बेडरूममधील कपाट उघडे असल्याचे व आतील २० ग्रॅम वजनांची गळ्यातील सोन्याची चेन, १० ग्रॅम वजनाची ऑरेंज खडा असलेली सोन्याची अंगठी, ३५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील बटणे २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे चार पैंजण, ६५ हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज गायब असल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिंगरप्रिंट युनिट व डॉग स्क्वॉडच्या साहाय्याने तपास केला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!