श्रीरामपूर तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, शेतकऱ्यांच्या शेतातून चोरले दोन गुंठे गवत

Published on -

श्रीरामपूर- तालुक्यातील उक्कलगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, शेतातील उभी चारा पिके चोरून नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
जून महिना सरून जुलै उजाडला तरी पावसाचा थेंबही पडेनासा झाल्याने आधीच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सुरुवातीला पडलेल्या अवकाळी पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली.

आता ती पिके कोमेजू लागली आहेत. थोड्या फार पाण्यावर घास व इतर चारा पिके तग धरून असली तरी आता भुरट्या चोरांनी त्याकडेही आपला मोर्चा वळवला आहे. काल रात्रीच्या सुमारास किशोर भाऊसाहेब जगधने यांच्या शेतातून जवळपास एक दोन गुंठे गिन्ही गवताची चोरी करून चोरटा पसार झाला आहे.

उक्कलगाव-खंडाळा रस्त्यावर दोन्ही गावाच्या अगदी मध्यावर सर्व्हे नं.३०४ मध्ये जगधने यांची शेती आहे. शेतीपासून वस्तीचे अंतर तीन ते चार किलोमिटर असल्याने व आसपास दाट लोकवस्ती नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही संधी साधली आहे. विशेष म्हणजे ही शेती डांबरी रस्त्यालगत असल्याने चोरट्यांना चोरी करताना फारसे कष्टही घ्यावे लागले नाहीत. बेलापूर पोलिसांनी या भागात गस्त वाढवून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जगधने यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!