कोपरगाव-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोपरगाव येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुल, कोकमठाण यांनी अभूतपूर्व यश मिळविले आहे. या परीक्षेत शाळेच्या १२१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.
विशेषतः इयत्ता ८ वीच्या ११३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून, १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारी ही राज्यातील एकमेव शाळा ठरली आहे. याशिवाय, इयत्ता ५ वीच्या ८ विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदवले आहे. या यशामुळे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिकच्या पाच विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेचा गौरव वाढवला आहे. यामध्ये श्रेयश नलावडे याने २७४ गुणांसह राज्यात ११ वा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. श्रेयश भवर आणि धनश्री रक्ताटे यांनी प्रत्येकी २७२ गुण मिळवत राज्यात १३ वा क्रमांक आणि जिल्ह्यात अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. श्रीतेज इंगोले आणि सिध्दार्थ पगारे यांनी प्रत्येकी २६८ गुणांसह राज्यात १६ वा आणि जिल्ह्यात अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्ह्यातील इयत्ता ८ वीच्या ग्रामीण गटातील राज्य गुणवत्ता यादीतील सर्व पाच विद्यार्थी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे आहेत.
या अभूतपूर्व यशामागे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे सुक्ष्म नियोजन आणि अथक परिश्रम आहेत. प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले की, अभ्यासक्रमाचे काटेकोर नियोजन, सुट्टीतील तयारी शिबिरे, जादा वर्ग, स्मार्ट संडे, सुपर नाईट, सुवर्ण पहाट अभ्यासिका, सराव परीक्षा आणि तज्ञांचे मार्गदर्शन यांचा एकत्रित परिणाम या यशात दिसून येतो. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले, ज्यामुळे त्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळाले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख अनिल सोनवणे, सचिन डांगे, सागर अहिरे, रविंद्र देठे, रमेश कालेकर, बाळकृष्ण दौंड, मिना नरवडे, पर्यवेक्षक नयना शेटे, गणेश रासने, सुनील पाटील आणि नितीन अनाप यांचे मार्गदर्शन लाभले. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रेरणा आणि शैक्षणिक आधार दिला. आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, शाळा विद्यार्थ्यांचे सर्वगुणसंपन्न आणि सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कटिबद्ध आहे.
आत्मा मालिक शैक्षणिक संकुल हे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या छत्रछायेखाली कार्यरत आहे. या यशाबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्षे आणि मिरा पटेल यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. ट्रस्टने शाळेला सर्वतोपरी पाठबळ दिले असून, विद्यार्थ्यांच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.