अहिल्यानगर : वारीत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत एका वारकरी कुटुंबास दिला जातो. यानंतर येणाऱ्या धाकट्या वारीला देखील अशीच पूजा केली जाते व त्या देखील पूजेचा मान वारकरी कुटुंबास दिला जातो. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाथर्डीच्या पोपटराव फुंदे व अनुराधा फुंदे यांना पंढरपूरच्या धाकट्यावारीत विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला आहे.
पोपटराव उर्फ दादासाहेब फुंदे हे कृतिशील शिक्षक म्हणून तालुक्याला व सामाजिक कार्यात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांनी आजवर अनेक विधवा महिलांना रोजगार निर्मितीसाठी चांगले काम केले असून, शिक्षण क्षेत्रात त्यांनी कौतुकास्पद काम केले आहे.

त्यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी त्यांची जिथे बदली होईल त्या शाळेत पाथर्डीतील काही पालक आपले विद्यार्थ्यांना प्रवेश घेतात. मोहरी व माळी बाभूळगाव या गावांत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत अतिशय चांगले उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना निष्काम व निस्वार्थीपणे समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी तसेच विधवा भगिनी व अनाथांसह दीनदुबळ्यांना मदत करतात. गेली काही वर्षे मोफत कीर्तन-प्रवचन सेवेच्या माध्यमातून विशेषत: तरुणांमध्ये विठ्ठलभक्ती रुजवण्याचं व भागवतधर्माचा प्रसार करण्याचं काम केले आहे.
ह.भ.प.भागीरथी बाबा उर्फ पोपटराव फुंदे व त्यांच्या पत्नी तथा मोहटादेवी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त अनुराधा केदार-फुंदे, आई भागीरथी व मुले वेदांत, वरद या फुंदे परिवाराला धाकटी आषाढी या पर्वणीतील विठ्ठल-रुक्मिणी महापुजेचा मान मिळाला आहे. मंदिर समितीने आयोजित ऑनलाईन सोडतीत या सेवाव्रती परिवाराची निवड होणे हे परमभाग्य असल्याने या परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.