अहिल्यानगरमधील भोरवाडीमध्ये यात्रेनिमित्त हजारो बैलगाडा शौकिनांच्या उपस्थित रंगला शर्यतीचा थरार

Published on -

वाळकी- नगर तालुक्यातील भोरवाडी येथे बुधवार (दि. ९) रोजी नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यती पार पडल्या. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेला हा चित्तथरारक शर्यतींचा थरार तब्बल १० तास रंगला. या शर्यतीसाठी गाडा मालकांनी सुमारे एक हजार बैल आणि २०० घोडे आणले होते. दिवसभरात जिल्ह्यातील हजारो बैलगाडा शौकिनांनी शर्यतीत रंगणारा थरार पाहण्यासाठी भोरवाडी येथे गर्दी केली होती.

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने आता राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. नगर तालुक्यात मात्र कोठेही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात नव्हते. ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक राहुल जाधव तसेच राहुल जाधव युवा मंच यांच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून
बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. भोरवाडी येथील श्री. हनुमान सप्ताह यात्रा उत्सवानिमित्त येथे तीन वर्षांपासून आयोजित होत असलेल्या बैलगाडा शर्यतीबाबत मोठी उत्सुकता असल्याने दिवसभरात या शर्यती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने बैलगाडा शौकिनांनी हजेरी लावली होती.

या वर्षीही बुधवारी भोरवाडीमध्ये नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यती पार पडल्या. दिवसभरात रंगलेल्या बैलगाडा शर्यतीच्या थरारामध्ये घाटाचा राजा विजय भगवान लोमटे यांचा दहशत किंग, रामशेठ विहान, विजय शेळके यांचा धिंगान्या, बापूराजे देशमुखांचा डमरू, शरद शिंदे यांचा भैरव यांनी अकरा सेकंदामध्ये घाट पार करून घाटाचा राजाचा होण्याचा मान मिळवला तर पांडुरंग किसन काळे यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक मिळविला.

अर्णव नवनाथ पायमोडे यांनी द्वितीय तर विजय भगवान लोमटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. धुळ्या ग्रुप, तुळजाई मित्र परिवार यांनी चतुर्थ, निलेश काळे, सूरज जगदाळे यांनी पाचवा, विशाल खटाटे यांनी सहावा, मैत्री ग्रुप यांनी सातवा, रंगनाथ गुळवे यांनी आठवा, प्रविण गीते यांनी नववा तर तुकाराम झावरे यांनी दहावा क्रमांक पटकावला. बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकासाठी ४१ हजार, द्वितीय
३१ हजार तर तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

त्याचबरोबर विजेत्यांना मोटारसायल, फ्रीज, एलईडी टीव्ही, कुलर, फॅन या वस्तूंसह रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. अनेक गावचे सरपंच उपस्थित होते तसेच दिवसभरात सात ते आठ हजार बैलगाडा शौकिनांनी शर्यतीच थरार पाहण्यासाठी उपस्थिती दर्शविली. बैलगाडा शर्यंत यशस्वी करणायासाठी राहुल जाधव युवा मंचचे सर्व पदाधिकारी, भोरवाडी गावचे ग्रामस्थ व इतर मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.

ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खिलार बैलजोडीच्या किंमती या लाखोंच्या घरात गेल्या आहेत. भोरवाडीतील बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात राहुल जाधव युवा मंच व ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. सर्वांच्या पाठबळामुळेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून व्यवस्थित पार पाडता आली.
-राहुल जाधव (उद्योजक व ग्रा. पं. सदस्य).

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!