गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी

Published on -

पाथर्डी- श्रीक्षेत्र भगवानगड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. वारकरी संप्रदयात एक आध्यात्मिक केंद्र म्हणून भगवानगडाची ओळख असून, ही ख्याती वाढत चालली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचे दर्शन व पूजन करण्यासाठी हजारो भगवान भक्त गडावर दाखल झाले होते. भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी व शिष्यगणांनी भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे पूजन केले. गुरूपौर्णिमा सुरू होताच भाविकांनी भगवानगडावर येऊन संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले.

दरवर्षी आषाढी एकादशीनिमीत्त पंढरपूरला गेलेली भगवानगडाची पालखी पुन्हा भगवान गडावर पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘काला’ केला जातो. गडाचे मठाधिपती ह.भ.प. न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरवरून श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखीसोबत परतलेले वारकरी तसेच भगवानगडाचा भक्तवर्ग यांच्या उपस्थितीत हा काल्याचा सोहळा साजरा करण्यात येत असतो.

योगायोगाने पालखीच्या काल्याच्या दिवशी गुरुपौर्णिमा येत असल्याने हा एक दुग्धशर्करा योग बनतो. गुरुवारी गडावरील प्रधान आचार्य ह.भ.प. नारायण महाराज शास्त्री (स्वामीजी) यांनी गडावरील विजयी श्री. पांडुरंगाचा अभिषेक करून वै. गुरुवर्य श्री संत भगवानबाबा, वै. गुरुवर्य श्री संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचा अभिषेक व महापूजा केली. त्यांनतर सर्व भाविकांनी श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ. श्री. नामदेव महाराज शास्त्री बाबांना पुष्पहार घालून आपल्या श्रीगुरुंचे यथोचित गुरुपूजन केले.

श्रीगुरुंचे पूजन करण्यासाठी गडाचे प्रधानचार्य नारायण स्वामीजी, शिरूर कासार येथील सिध्देश्वर संस्थानचे मठाधीपती ह.भ.प. श्री. विवेकानंद महाराज शास्त्री, गडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. श्री.कृष्णा महाराज शास्त्री, राजा हरिश्चंद्र संस्थानचे मठाधिपती हभप भगवान महाराज राजपूत, भालगाव येथल मच्छिंद्रनाथ संस्थानचे मठाधीपती ह.भ.प. नवनाथ महाराज शास्त्री, मिडसांगवी येथील सालसिध्द बाबा संस्थांनचे मठाधिपती ह.भ.प. हनुमंत महाराज शास्त्री, तागडगाव येथील भगवान बाबा संस्थानचे मठाधिपती ह.भ.प श्री. अतुल महाराज शास्त्री, एकनाथवाडी येथील निरजंन संस्थानचे हभप संतोष महाराज गिते, भिलवडे येथिल संस्थानचे गणेश महाराज बडे यांच्यासह गडाचे शेकडो विद्यार्थी व हजारो भाविकांची उपस्थिती होती.

उपस्थित हजारो भाविकांना गडाच्या भाविकांच्या वतीने स्वादिष्ट व रुचकर महाप्रसादाची पंगत दिली. दिवसभर श्रीगुरुंच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ सुरूच होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!