करंजी- शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची जन्म आणि मृत्यूची नोंद वेळेत होणे महत्त्वाचे आहे, असे असतानादेखील पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील तीन सख्ख्या भावांची २९ वर्षानंतरही जन्माची ग्रामपंचायत दप्तरी अथवा इतर कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात नोंदच नसल्याने या तीनही भावंडांना शासनाच्या एकाही योजनेचा लाभ घेता येईना. त्यामुळे यांच्या जन्म तारखेबाबत गोंधळ उडाला आहे.
याबाबतची माहिती अशी की, कामत शिंगवे येथील भाऊसाहेब मनोहर बर्डे जन्मतारीख ८/७/१९९७ (वय २९), सागर मनोहर बर्डे जन्मतारीख १८/१२/१९९९ (वय २७), रोहन मनोहर बर्डे जन्मतारीख १/१२/२००० (वय २५). या तीनही भावंडांच्या जन्माची ग्रामपंचायत दप्तरी नोंदच नसल्याने या कुटुंबाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.

जन्माचा दाखला मिळावा, यासाठी या तीनही भावंडांनी चार दिवसांपूर्वी तालुक्याचे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांची मिरी येथे भेट घेतली. २९ वर्षानंतर जन्माचा दाखला नाही, हे ऐकून तहसीलदार डॉ. नाईक यांनी देखील कपाळाला हात लावला.
बालवयापासूनच आई-वडिलांबरोबर ऊस तोडणीसाठी गेल्यामुळे या तीनही भावंडांना प्राथमिक शिक्षणदेखील घेता आले नाही, त्यामुळे जन्म दाखल्याबरोबरच शिक्षणाचादेखील मोठा अडसर यांच्या भविष्याच्या उजाळणीसाठी अंधकारमय ठरत आहे.