चारचाकी वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून एसटी चालकाला तिघांनी शिवीगाळ करत केली मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

Published on -

राहुरी- चारचाकी वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरुन तिघा जणांनी एसटी बस चालकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर ग्रीन हॉटेल समोर काल दि. ११ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत राहुरी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत तात्याराम शिवाजी दहिफळे (वय ३६ वर्षे) यांनी म्हटले आहे की, मी बस चालक म्हणून नाशिक आगारामध्ये नोकरी करतो. दि. ११ जुलै २०२५ रोजी मी जामखेड येथून एम. एच. १३ सी यु ८४८७ क्रमांकाची लातूर ते नाशिक ही बस घेऊन नाशिककडे निघालो होतो. पहाटे १.१५ वाजे दरम्यान एसटी बस राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर ग्रीन हॉटेल समोर असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारने बसला ड्रायव्हर साईडने धक्का दिला.

कार बसला पुढे आडवी लावून बस थांबवली. तेव्हा कार मधून दोन अनोळखी इसम उतरले व त्यांनी मला मारहाण केली. त्याचवेळी ग्रीन हॉटेल मधून एक इसम पळत आला व त्याने मला शिवीगाळ केली. तसेच गचांडी धरुन मारहाण करत’ तु ह्या रोडने येथून परत बस घेऊन जाशीलच ना मग तुझ्याकडे पाहील’, अशी धमकी दिली. घटनेनंतर मी एसटी बस थेट राहुरी पोलीस ठाण्यात आणली आणि गुन्हा दाखल केला.

एसटी बस चालक तात्याराम शिवाजी दहीफळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पिंटूनाना साळवे व दोन अनोळखी इसम अशा तीन जणांवर मारहाण, धमकी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!