तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या अहिल्यानगरच्या तीन तरूणाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

Published on -

अहिल्यानगर- आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या शेवगाव तालुक्यातील तीन युवकांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात दि. ८ जुलै रोजी घडला.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसारः आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा भागात प्रवास करताना कार पलटी होऊन सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. अपघातात शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील सौरभ विष्णू अकोलकर, सोनविहीर येथील तुषार सुनील विखे तर विद्यानगर, शेवगाव येथील श्रीकांत थोरात या तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमित अकोलकर हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

सदरची घटना आंध्रप्रदेशमध्ये घडल्याने अधिक माहितीचा तपशील अद्याप समजू शकला नाही. दरम्यान, तेथील स्थानिक भाषेत, एका वृत्तवाहिनीने सदर अपघाताचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकलेल्या बातमीमुळे सदरची दुर्दैवी घटनेचे वृत्त समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधितांचे नातेवाईक तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले.

शवविच्छेदन झाल्यानंतर तिघांचेही मृतदेह अॅम्ब्युलन्सने शेवगावला आणून तिघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातात गंभीर झालेल्या तरुणांवर मात्र त्याच भागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. तिरुपती बालाजीच्या देवदर्शनासाठी गेलेले हे चारही युवक अविवाहित असून, त्यातील तुषार सुनील विखे हा युवक आई-वडिलांना एकुलता एक असल्याचे सांगण्यात आले. अपघातामुळे शेवगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!