अहिल्यानगर : शेती परवडत नाही,शहाण्याने शेती करू नये अशी ओरड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी तरुणांनी शेती देखील चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते हे सिद्ध केले आहे. ही उदाहरणे तरूण व नवीन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत, आणि नियोजनाचा योग्य वापर केल्यास अल्पभूधारक शेतकरीही भरघोस उत्पन्न मिळवू शकतो हे शेवगाव तालुक्यातील युवा शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे.
सध्या शेती व्यवसाय म्हंटलं की लोक नाक मुरडतात अन लगेच नको म्हणतात. अगदी शेतकरी आई-वडील देखील आपल्या मुलाला शेती करू नका असं सांगत असतात. शेतीकडे पाहण्याचा बदलत असलेल्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे अनेक तरुणांची लग्न देखील होत नाहीत. शेतीमालाला न मिळणारा भाव, औषधांचा खर्च, दुष्काळ, अवेळी पडणारा पाऊस, निसर्गाचा लहरीपणा या सारख्या समस्यांमुळे शेती करायला सध्याची तरुणाई तयार होत नाही.

परंतु आता याच शेतीमधून अनेक शिकलेल्या नवीन तरुणांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत शेती देखील फायद्याची ठरू शकते हे दाखवून दिले आहे. शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील शेतकऱ्याने एका एकरात केळीची शेती करून लाखोंची कमाई केली आहे. शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील शेतकरी पुत्र बाबासाहेब भिमराज ठोंबरे यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये जानेवारी महिन्यामध्येकेळी व कलिंगड अशी दुबार पीकाची लागवड केली होती. चालू वर्ष कलिंगड पिकास दर नसल्यामुळे ठोंबरे यांना खर्च देखील मिळाला नाही.
परंतु त्यांनी हताश न होता कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर व कमीत-कमी खर्चामध्ये केळी पिकाचे व्यवस्थापन केले. आणि आज त्यांना २२ रुपये किलो प्रमाणे जागेवर दर भेटला. ठोंबरे यांची केळीची एकूण १२०० झाड आहेत एका घडाचे वजन सरासरी २६ किलो निघत आहे. ठोंबरे यांना त्यांच्या शेतामधून अंदाजे ७ ते ८ लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे या म्हणीप्रमाणे शेतकरी ठोंबरे यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेती करत त्यात यश मिळवल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.