करंजी : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासंदर्भात बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत तिसगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून चार दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते मन्सूरभाई पठाण, सतीश साळवे, सचिन खंडागळे, दिनेश ससाने, नितीन खंडागळे, पोपट शिरसाठ, अक्षय साळवे, नितीन लवांडे, संजय लवांडे, प्रसाद देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.
त्यानंतर प्रशासनाने तिसगावचा पाणीप्रश्न सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत तिसगावला आठ ते दहा दिवसाला पाणी देण्याच्या नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. या वेळी उपोषणाला बसलेले कार्यकर्ते व तालुका प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बैठकीत तांत्रिक अडचणींवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचे ठरवले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मन्सूरभाई पठाण यांनी तिसगावचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. संपूर्ण तिसगावकर प्रशासनाच्या सोबत आहेत.

तिसगावकरांना नियमित व भरपूर पाणी मिळाले तर पाणीपट्टी भरण्यासदेखील तिसगावकर पुढे राहतील, अशी ग्वाही पठाण यांनी या वेळी दिली. पुढील दोन-चार दिवसांत विस्तार अधिकारी नांगरे व त्यांचे इतर सहकारी तिसगाव येथील गावांतर्गत पाणी पुरवठ्याबातच्या तांत्रिक अडचणी जाणून घेतानाच अनाधिकृत नळ कनेक्शन तपासणार आहेत. एकंदरीत तिसगावच्या पाणीप्रश्नासंदर्भात तालुका प्रशासन प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याने निश्चित तिसगावकरांना आता पंधरा दिवसाला तरी पाणी मिळेल, असे म्हणायला हरकत नाही.