तिसगावचा तलाठी सतीश धरम ५० हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडला

Published on -

करंजी- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि आडगाव या दोन गावांसाठी असलेले तलाठी सतीश रखमाजी धरम (वय ४० वर्षे) यास गुरुवारी ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय सुभाष घोरपडे (वय २७वर्ष धंदा-शेती रा. शिंगवे केशव) यांनी दि.३१ जुलै २०२५ रोजी लेखी तक्रार दिली की, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. सदर घरकुलाचा पाया भरण्याच्या कामकाजाकरीता मुरूम व जाडसर वाळूच्या दोन गाड्या तक्रारदार यांनी नदीपत्रातून आणून घरकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी खाली केल्या होत्या.

सदर मुरूम आणण्याकरिता त्यांनी त्यांचे चुलते व मित्र यांच्या जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर केला होता. घोरपडे यांच्या मुरूम व वाळूची माहिती तलाठी धरम यांना समजल्यानंतर त्यांनी नायब तहसीलदार सानप यांच्यासहरात्रीच्या वेळी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली होती. त्यानंतर तलाठी धरम यांनी घोरपडे यांना तुम्ही गौण खनिजाची अवैद्य वाहतूक केलेली आहे,

तुमच्या वाहनावर व तुमच्यावर कारवाई होऊ द्यायची नसेल तर नायब तहसीलदार यांना ५० हजार रुपये द्यावे लागतील. असे म्हणत तलाठी धरम याने तक्रारदारास ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. सदरची लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून तलाठी धरम यांनी स्वीकारताच लाचलुचपत विभागाने त्यांना सापळा लावून तात्काळ ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे, बाबासाहेब कराड, चालक हारून शेख यांनी केली आहे.

तिसगाव मधूनही होत्या तक्रारी लाच घेताना अटक झालेला तलाठी धरम माजी सैनिक असल्याचे बोलले जात आहे. तिसगाव येथील शेतकऱ्यांकडून देखील तो पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक पातळीवर सुरू होत्या. केशव शिंगवे येथील घोरपडे ज्यांना घरकुल मंजूर झालेल आहे अशा गरीब व्यक्तीकडून ५० हजाराची लाच घेताना धरम अखेर जाळ्यात अडकलाच.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!