छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोलगेट हटवले, मात्र सदर ठिकाणच्या माती आणि मुरूमामुळे अपघाताचे प्रमाण वाढले, नागरिक संतप्त

Published on -

जेऊर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जेऊर शिवारातील टोलगेट तब्बल आठ वर्षानंतर हटविण्यात आले आहे. टोलगेट हटविल्यानंतर सदर ठिकाणी असलेली माती मुरूम आहे त्याच अवस्थेत असल्याने रस्त्यावर चिखल साचत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात वाढले असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारामध्ये टोलनाका सुरू होता. टोल नाक्याची मुदत संपल्यानंतर देखील अनेक वर्ष टोलगेट हटविण्यात आले नव्हते. एका बाजूचे टोल गेट तर अपघातानेच हटविले गेले.

तर अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टोलगेट मागील महिन्यात हटविण्यात आले आहे. टोलगेट परिसरात अपघात टाळण्यासाठी पथदिवे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे तसेच इतर उपाययोजना उपलब्ध नसल्याने अनेक अपघात घडले होते. वारंवार टोलगेट हटविण्याची मागणी करून देखील टोलगेट हटविण्यात येत नव्हते. अखेर गेल्या महिन्यात टोलगेट हटविण्यात आले आहे.

टोलगेट हटविल्यानंतर परिसरात असणारे दुभाजक जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आलेले आहेत. परंतु खाली असलेली माती आहे तशीच ठेवण्यात आल्याने पावसात सदर ठिकाणी चिखल होतो. वाहनांमुळे सदरचा चिखल महामार्गावर येत असून दुचाकींच्या अपघातात वाढ झाली असल्याची चर्चा नागरिक करत आहेत. सदर ठिकाणी डांबरीकरण करण्याची गरज आहे.

टोलगेट हटविल्यानंतर महिना उलटून देखील सदर ठिकाणी काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. माती उघड्यावर असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी हटविण्यात आलेल्या टोलगेट परिसरात महामार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!