श्रीगोंदा- लिंबू व्यावसायिकाला गावात लिंबू खरेदी करायचे नाही, असे सांगत १५ ते १६ जणांनी लाकडी दाडक्याने मारहाण करून दोन अंगठ्या तसेच खिशातील एक लाख ९२ हजार काढून घेत लिंबूखरेदी करीता पुन्हा आला तर हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिली. बांगर्डे ते खांडगाव रोडवर दि.५ रोजी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अमोल सुरेश म्हेत्रे वय २५ यांच्या फिर्यादीवरून सागर बोरुडे, दाद सातपुते दोघे रा. घोगरगाव तसेच इतर १५ अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे लिंबू व्यापारी आहेत. नेहमीप्रमाणे ते लिंबू खरेदीसाठी बांगर्डे भागातून जात असताना आरोपी सागर बोरुडे, दादा सातपुते व त्यांच्या सोबत असलेल्या १५ अनोळखी व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवले. ‘तू या गावात लिंबू खरेदी करू नकोस’ असे म्हणत त्यांची गचांडी धरली व जबरदस्तीने गाडीतून खाली ओढून शेजारच्या शेतात नेले.
तिथे फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अमोल मेहत्रे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या उजव्या हातातील दोन अंगठ्या आणि खिशातील १ लाख ९२ हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेत ‘पुन्हा या भागात दिसलास तर तुझे हातपाय तोडून टाकू’ अशी धमकी दिली. याबाबत पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.