राहुरी- शहरातील वाढती गुन्हेगारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची चोरी आणि दरोडे या घटनांनी व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली असून, या पार्श्वभूमीवर राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने २१ जुलै रोजी पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, २६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली असून, चार महिने लोटूनही आरोपी अटकेबाहेर आहेत. ४ जुलै रोजी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी शुक्लेश्वर चौकात व्यापारी अनुप दिलीप दरक यांच्या दीड लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरली. १४ जुलै रोजी पहाटे २ वाजता राजेंद्र भन्साळी यांच्या वर्धमान ज्वेलर्समध्ये ६२ लाख रुपयांचा दरोडा पडला. सर्व घटनांमध्ये गुन्हे दाखल झाले असले तरी आरोपी सापडलेले नाहीत.

यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, दोषींवर तात्काळ कारवाई, रात्रीची गस्त सुरू करणे, चौकांमध्ये बंदोबस्त वाढवणे यांसह मागण्या करण्यात आल्या. दरक आणि भन्साळी यांची प्रकरणे आठ दिवसांत उकलली नाहीत तर बाजारपेठ बंद करून ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदनावर प्रकाश पारख, अनिल भट्टड, संतोष लोढा, संजीव उदावंत, अनिल कासार, कांता तनपुरे, देवेंद्र लांबे, सूर्यकांत भुजाडी, विलास तरवडे, योगेश चुत्तर, संजय सुराणा, प्रशांत सुतार, संतोष सुराणा, नवनीत शिंगी, प्रशांत नहार, राहुल उदावंत, मनोज अंबिलवादे, आनंद देसरडा, नवनीत चोरडिया, सुभाष सावज, किरण सुराणा, स्वप्निल उदावंत, गौरव झंवर, अक्षय बजाज, दादासाहेब भडकवाल, गिरीश अगरवाल, अख्तर कादरी, अनुप दरक, रवींद्र उदावंत यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.