कर्जत- सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कर्जत पोलिसांनी राशीन येथील घटनेप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी काल कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अत्यावश्यक सेवा वगळता पुकारण्यात आलेल्या कर्जत बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रविवार (दि.१३) जुलै रोजी राशीन येथील महात्मा ज्योतीराव फुले चौकात भगवा ध्वज उभारण्यात आला. या वेळी झालेल्या राडयामुळे कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या शिलेदारांवर कर्जत पोलिसांनी शहानिशा न करता जे गुन्हे दाखल केले ते खोटे आहेत, असा आरोप करून हे गुन्हे पोलिसांनी मागे घ्यावेत. या मागणीसाठी काल अत्यावश्यक सेवा वगळता कर्जत बंदचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला कर्जत शहरातील व्यापारी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले.

त्यानंतर येथेच धरणे धरले तसेच रास्ता रोको आंदोलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. राशीन येथील झालेल्या घटनेची व गुन्ह्यांची चौकशी करू अशी ग्वाही देण्यात आली, त्यानंतर धरणे व रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गुरू बिराजदार यांना देण्यात आले.
या वेळी कर्जतचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, सकल मराठा समाजाचे अॅड. बाळासाहेब शिंदे, विशाल मांडगे, धीरज पडवळे, धनंजय राणे, महेंद्र धांडे, सुनील यादव, राहुल नवले, निलेश यादव, दिपक मांडगे आदींसह कर्जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राशीन येथील महात्मा ज्योतीराव फुले चौकाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज चौक असे कधीही होणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. राशीन येथील महात्मा फुले चौकाचे नामकरण होणार आहे, ही अफवा कोणीतरी राजकीय हेतूने पसरवली आहे, त्यामुळे दोन समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होता तसे होणार नाही. याबाबत अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये.
– वैभव लाळगे
(माजी समन्वयक – सकल मराठा समाज, कर्जत तालुका).