Railway News:- अहिल्यानगर ते बीड हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून या रेल्वे मार्गामुळे बीड आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी ही दक्षिण भारत तसेच पुणे व मुंबईशी वाढण्यास मदत होणार आहे. 35 वर्षांपूर्वी अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली होती व तेव्हा यावर 8000 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही कारणांमुळे हा प्रकल्प रखडला व आठ हजार कोटींचा हा खर्च तब्बल आता 35000 कोटींच्या घरात गेला आहे. हा रेल्वे मार्ग अनेक अर्थांनी खूप महत्त्वपूर्ण असून परळी पर्यंत हा लोहमार्ग जेव्हा होईल तेव्हा बीड जिल्ह्याचा दक्षिण भारत तसेच पुणे व मुंबईपर्यंतची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे व याचा धार्मिक पर्यटन व कृषी क्षेत्राला देखील खूप मोठा लाभ होणार आहे. अहिल्यानगर ते बीड या दरम्यान सप्टेंबर महिन्यामध्येच रेल्वे धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. चला तर मग त्या संबंधीची थोडक्यात माहिती आपण बघू.
17 सप्टेंबरला धावणारे नगर ते बीड रेल्वे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर ते बीड या दोन शहरादरम्यान 17 सप्टेंबर पासून रेल्वे धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाहीतर अहिल्यानगर ते परळी दरम्यानचा रेल्वेमार्ग 25 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. साधारणपणे 35 वर्षांपूर्वी या रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आलेली होती. या रेल्वे मार्गाची घोषणा होण्यामागे तत्कालीन खा.स्व.गोपीनाथ मुंडे आणि अहिल्यानगरचे तत्कालीन खा.स्व. दिलीप गांधी यांचे योगदान मोठे आहे. साधारण जर आपण पस्तीस वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने बघितली तर ती अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये होती. वाहनांची संख्या कमी होती तसेच लोकसंख्या देखील कमी असल्याने या कालावधीमध्ये असा प्रकल्प असणे खूप गरजेचे होते. सध्याच्या कालावधीमध्ये आता दर्जेदार रस्त्यांची संख्या वाढली तसेच मूलभूत सुविधा व वाहनांची संख्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे सध्या तरी या रेल्वे मार्गाला कमी प्रतिसाद मिळणार असे चित्र असले तरी येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या काळात मुंबई तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर तसेच नांदेड, हैदराबाद आणि परळी वैजनाथ सारख्या ठिकाणांसाठी हा रेल्वे मार्ग एक संजीवनी ठरेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.या रेल्वे मार्गामुळे नगर ते बीड या दोन शहरा दरम्यान प्रवासी व मालगाड्या धावण्यास मदत होईल व भविष्यामध्ये परळी शहरापर्यंत ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर व्हाया परळी हैदराबाद- अहिल्यानगर- पुणे- मुंबई असा नवा उत्तर- दक्षिण कॉरिडॉर तयार होणार आहे व यामुळे दक्षिण भारतातील औद्योगिक उत्पादने थेट मुंबई व पुण्याकडे पोहोचू शकणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील महत्त्वाच्या असलेल्या जेएनपीटी बंदराला थेट पर्यायी मार्ग यामुळे उपलब्ध होणार आहे.

धार्मिक पर्यटनासाठी महत्त्वाचा
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्याला माहित आहे या जिल्ह्यामध्ये शिर्डी, शनिशिंगणापूर तसेच अहिल्यानगर किल्ला, बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे परळी वैजनाथ, आंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी या ठिकाणी हा रेल्वेमार्ग थेट कनेक्ट होणार असल्याने यात्रेकरू आणि धार्मिक पर्यटकांना याचा खूप मोठा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण मदत होईल. बीड- अहिल्यानगर तसेच पुणे किंवा बीड- अहिल्यानगर- मुंबई अशा मार्गावर जर प्रवासी गाडी सुरू झाली तर विद्यार्थी तसेच नोकरदार व व्यापारी वर्गाला थेट पुणे आणि मुंबई रेल्वेने गाठता येणार आहे.
कृषी क्षेत्राला होईल फायदा
कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून देखील हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा असून बीड जिल्ह्यातील ऊस तसेच सोयाबीन, कापूस यासारख्या महत्त्वाच्या शेती उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेत रेल्वेने जलद आणि सहजरित्या पोहोचवता येणार आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई आणि पुणे येथील बाजारपेठेत शेतीमाल घेऊन जाणे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे व रेल्वे वाहतुकीमुळे वाहतुकीचा खर्च देखील कमी होऊन पर्यायाने शेतकऱ्यांचा याचा खूप मोठा फायदा होणार आहे.