शनिशिंगणापूर देवस्थानातील कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. त्यासह दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे शनिशिंगणापूर येथे आले आणि शनिदेवाला पुष्पहार अर्पण अर्पण करून दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी भाविकांच्या २० वर्षांच्या साडेसातीचा शेवट झाला असल्याची प्रतिक्रिया दिली.घोटाळ्याविरोधात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडणारे आमदार लंघे शनिशिंगणापूर येथे भाजप- शिवसेना मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांसह पायी चालत मंदिरात दाखल झाले. त्यावेळी गुजरातहून आलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत करत दूध व फराळ वाटपाचा मान आमदार लंघे यांना दिला.

श्री शिंगणापूर देवस्थान ट्रस्टवर अनावश्यक कामगार भरतीसह अनेक आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या श्रद्धेचा अपमान करणाऱ्या विश्वस्त मंडळाला जबाबदार धरले जात असून, त्यांच्यावर चौकशीचा फेरा सुरू झाला आहे.
आमदार लंघे यांनी स्पष्ट केले की, नेवासा तालुक्याला भयमुक्त करणे व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून रामराज्याची पुनर्स्थापना हे आपले उद्दिष्ट आहे. कार्यक्रमात दादासाहेब घायाळ आणि सुनील दरंदले यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार लंघे यांचा सन्मान केला. तसेच स्वर्गीय बाबुराव बानकर यांच्या चरित्र ग्रंथ व ‘श्री शनि रत्न महात्म्य’ पुस्तिकेच्या माध्यमातून सुरेश बानकर व भाऊसाहेब बानकर यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाला भाजप-शिवसेना मित्र पक्षाचे कार्यकर्ते ऋषिकेश शेटे, सचिन देसरडा, मनोज पारखे, प्रताप शिंदे, अॅड. अशोक कर्डक, अॅड. संदीप शिंदे, अॅड. मनोज हादे, माजी सरपंच देविदास साळुंखे, विशाल सुरपुरिया, अनिल गायकवाड, तालुका प्रमुख जगताप, अंकुश काळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास साळुंखे यांनी यावेळी म्हटले की, घोटाळ्यांचा मागोवा घेता घेता या प्रकरणातील मुळ आका कोण आहे, हे शोधणे आवश्यक आहे. देवस्थानच्या विश्वस्तांनीच पुरावे समोर आणले असल्यामुळे, श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याबद्दल त्यांच्या विरोधात कठोर कारवाई आवश्यक आहे.
आमदार लंघे यांनी विश्वास व्यक्त केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशीपूर्वीच दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन होईल. तसेच, भ्रष्ट यंत्रणेला क्लीन चीट देणाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.