नेवासा- शॉर्टसर्किटमुळे नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील जनार्धन कुंडलिक शेटे यांच्या सोनई शिवारातील शेतातील ऊस पीक नुकतेच जळून खाक झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडी येथील शेतकरी जनार्धन शेटे यांचे सोनई शिवारात गट नंबर ६६० मध्ये १ हेक्टर २० आर क्षेत्रात ३६५ जातीची आडसाली ऊस लागवड आहे. शनिवारी सकाळी १० वाजता शेतातील विजेच्या तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्कीटने) ऊस पिकास आग लागली.

आगीची तिव्रता भयानक होती की, मुळा कारखाना अग्निशामक येईपर्यंत सर्व क्षेत्र जळून खाक झाले. कारखाना अग्निशामकमुळे शेजारी असलेल्या शेतकऱ्यांचे ऊस पीक वाचले. अन्यथा मोठ्या क्षेत्रातील ऊस पीक जळीत झाले असते. सदरचे शेतकरी शेटे शनिवारी बाहेरगावी असल्याने सोनईचे ग्राम महसूल अधिकारी नानासाहेब साळवे व सहकारी सुरेश साळवे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
या आगीत अंदाजे २१० ते २३० टन ऊस जळाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी जनार्धन शेटे, श्रीनिवास शेटे, दत्तात्रय शेटे उपस्थित होते. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी शेटे यांनी केली आहे.