अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव सिद्धी हे गाव दुष्काळी पट्ट्यातले. भूप्रदेश खडकाळ, सिंचनाची कोणतीही सोय नाही. अशा परिस्थितीत इंगळे कुटुंब शेती करत होते. हुलगा, मटकीसारखी कोरडवाहू पिकं घेऊन जे काही मिळेल त्यावर समाधान मानायचं, हाच शेतकऱ्यांचा मार्ग होता. पण इंगळे कुटुंबातील पुढच्या पिढीने परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला.
शिक्षण आणि शेतीचा संगम
भाऊसाहेब इंगळे यांचे सुपुत्र ज्ञानदेव आणि दिलीप हे दोघेही उच्चशिक्षित. ज्ञानदेव इंगळे बीएस्सी अॅग्री झाले असून सध्या सेंट्रल बँकेत मॅनेजर आहेत, तर दिलीप इंगळे भारतीय सैन्यात सेवेत आहेत. नोकरीत स्थिरता मिळवली तरी मातीची ओढ काही कमी झाली नाही. ज्ञानदेव इंगळे यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून डाळिंब लागवडीचा अभ्यास केला. परिसरातील हवामान, जमीन आणि उपलब्ध संसाधन यांचा सखोल अभ्यास करून डाळिंब लागवडीसाठी नियोजन सुरू केलं.

जमिनीचे रूपांतर आणि जलसंधारण
तीन हेक्टर खडकाळ माळरान असलेल्या जमिनीत डाळिंब लागवड करण्यासाठी प्रथम मातीची सुधारणा करण्यात आली. शेतातून जाणाऱ्या ओढ्यातील पावसाचे पाणी अडवून शेततळे तयार केले. उन्हाळ्यातील टंचाई टाळण्यासाठी सहा किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन टाकून पाणी आणण्याची युक्ती केली.
सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचनाचा प्रभाव
इंगळे कुटुंबाने भगव्या जातीच्या डाळिंबाची निवड करून सेंद्रिय पद्धतीने शेती केली. निंबोळी खत, कोंबडी खत, शेणखत यांचा वापर करून झाडांची जोपासना केली. ठिबक सिंचनाच्या मदतीने कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवण्यावर भर दिला. आज त्यांचं डाळिंब क्षेत्र आरोग्यदायी आणि भरघोस उत्पादन देणारं बनलं आहे.
शेतीत महिलांचा सिंहाचा वाटा
दोघेही भाऊ नोकरीसाठी बाहेर असल्याने शेतीची जबाबदारी दिलीप इंगळे यांच्या पत्नी सोनाली इंगळे यांनी घेतली. त्या स्वतः ट्रॅक्टर चालवतात, औषध फवारणी करतात, बागेची मशागत आणि निगा राखतात. दिवसा मधमाशांमुळे औषध फवारणी शक्य नसल्याने त्या रात्री फवारणी करतात. पती-दीर बाहेर असतानाही सोनालीताईंनी बाग फुलवून दाखवली.
घरीच करतात रोपांची निर्मिती
ज्ञानदेव इंगळे यांनी डाळिंब झाडांवर गुटी कलम करून नवीन रोपं तयार करण्याची प्रक्रिया आत्मसात केली आहे. घरच्या घरी तयार होणाऱ्या रोपांमुळे रोप खरेदीसाठी लागणारा खर्च वाचला आणि वेळेचीही बचत झाली. एका हेक्टरपासून सुरू झालेली बाग आज तीन हेक्टरवर उभी आहे.
मधमाशांच्या मदतीने फळधारणा
डाळिंब फुलल्यावर त्याचे परागीकरण होणे महत्त्वाचे असते. यासाठी इंगळे कुटुंबाने चिखली घाटातून मधमाशांची पोती आणून बागेत सोडली. दिवसभर मधमाशा बागेत फुलांवर फिरतात आणि नैसर्गिक परागीकरण घडून येते. त्यामुळे फळधारणा मोठ्या प्रमाणावर होत असून उत्पादन वाढीस मदत होते.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
डाळिंबावर कोळी, मावा, पांढरी माशी, खोडमाशी अशा किडींचा तसेच सर्कसपोरा, फळकूज, जिवाणूजन्य करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. या सगळ्यांवर उपाययोजना करण्यासाठी इंगळे कुटुंब कृषी विभागाच्या सतत संपर्कात आहे. मंडल कृषी अधिकारी नारायण करांडे, अशोकराव वाळके, संतोष उगले आणि आरती नांगरे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.
उत्पन्नाची भरघोस वाढ
योग्य नियोजन, सेंद्रिय शेती, जलसंधारण आणि मेहनत या साऱ्याच्या जोरावर इंगळे कुटुंब वर्षाकाठी ३० ते ४० लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहे. खर्च वजा जाता शुद्ध नफा हातात पडतो, त्यामुळे शेती आता त्यांच्यासाठी फायदेशीर व्यवसाय ठरली आहे.