Sangamner News : संगमनेर शहरातील नियोजित एसटीपी प्लांटसाठी सुरू असलेल्या भूमिगत गटारीमध्ये गुदमरल्याने दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (१० जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरातील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलसमोर घडली. अतुल रतन पवार यांचा गुदमरून तर व रियाज पिंजारी (वय ३०, रा. मदिनानगर, संगमनेर) यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. जखमी अर्षद शेख यांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्लांटसाठी शहरामध्ये भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरातही गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारी काही कामगार याठिकाणी काम करत होते.

यातील अतुल रतन पवार (वय १९, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) हा कामगार भूमिगत गटारीत चेंबर साफ करण्यासाठी उतरला होता. गटारीमध्ये ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्याने त्याचा जीव गुदमरला. त्याला बाहेर काढण्यासाठी रियाज पिंजारी व अर्षद शेख हे दोघे कामगार गटारीत उतरले. कामगार भूमिगत गटारीत अडकल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. यानंतर काही क्षणातच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
सदर घटनेची माहिती समजताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. संगमनेर नगरपालिकेचे अग्निशामक पथक, रुग्णवाहिका, जेसीबी मशीन तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून जेसीबीच्या सहाय्याने गटारीत अडकलेल्यांना एसटीपी प्लांटच्या
बाहेर काढण्यात आले. गटारीत पडलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ दवाखान्यात हलविले होते. याप्रकरणातील दोषी ठेकेदारांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
घटना दुर्दैवी आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मयत झालेल्या अतुल पवार व रियाज पिंजारी यांच्या कुटुंबाच्या आम्ही पाठीशी आहोत. या घटनेमध्ये दोषी असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार असून कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये दोषी असलेल्यांवर कठोर कारवाईच्या सूचना नगरपालिका मुख्याधिकारी कोकरे व पोलीस अधिकारी यांना दिल्या आहेत.
– आ. अमोल खताळ