अहिल्यानगरमध्ये स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली गुजरातच्या दोन तरूणांना १५ लाखाला गंडवलं, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?

Published on -

श्रीगोंदा : तालुक्यातील विसापूर परिसरात गुजरात येथून आलेल्या दोन तरुणांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे पंधरा लाखांना लुटल्याची घटना मंगळवारी (दि.१) दुपारी घडली. बेलवंडी पोलिसांनी त्यांच्या हद्दीत ‘ड्रॉप’ झाल्याचे नाकारले आहे. मात्र, त्याचवेळी सुपा पोलिसांनी बेलवंडी हद्दीत ‘ड्रॉप’ झाल्याचे व त्याबाबत तक्रार देण्यासाठी लोक आमच्याकडे आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे बेलवंडी पोलिसांचा अजब कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवत लुटणाऱ्या टोळीने मागील काही दिवसात दोन तीन वेळा ड्रॉप केल्याच्या घटना चर्चेत असताना मंगळवारी दुपारी गुजरात येथील नागरिकांना आमिष दाखवत लुटल्याच्या चर्चे नंतर ही ड्रॉप टाकून लूट करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुजरात येथील दोघांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दोघांना तालुक्यातील विसापूर परिसरात बोलावून घेण्यात आले.

मंगळवारी दुपारी ते दोघे गुजरात येथून दिलेल्या ठिकाणावर चारचाकी वाहनाने रक्कम घेऊन आले. तिथे येताच तीन-चार जणांनी त्यांना जबर मारहाण करीत त्यांच्याकडील सुमारे पंधरा लाखांची रोकड व मोबाईल फोन चोरून तिथून पसार झाले. या घटने नंतर गडबडलेले दोन्ही तरुण सुरुवातीला सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात गेले.

सुपा पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या मदतीला एक कर्मचारी देऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विसापूर परिसरात झाला असल्याने लुटल्या गेलेल्या तरुणांना बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी होऊन या प्रकरणी लूट झाल्याचा गुन्हा दाखल होण्याऐवजी केवळ मोबाईल चोरी झाल्याचा गुन्हा नोंदविला गेला. लुटीच्या घटनेबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी खाजगी मधे दुजोरा दिला तर सुपा पोलिस निरीक्षकांनी घटनेबाबत फिर्यादी पोलिस ठाण्यात येऊन गेल्याचे सांगितले.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?

बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रॉप सारखे प्रकार मागील काही दिवसात अनेक वेळा घडल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही की दाखल करून घेतला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या घटनेची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. ड्रॉप’चा गंभीर प्रकार उजेडात येऊ नये म्हणून तर बेलवंडी पोलिसांनी केवळ मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काही दिवसांपासून बेलवंडी पोलीस ठाणे तसेच पोलिस अधिकारी सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे.’

विसापूर परिसरात ड्रॉप घडल्याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. आमच्याकडे मोबाईल चोरी झाल्याची तक्रार आली आहे. त्यानुसार आम्ही मोबाईल चोरीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत.
-संतोष भंडारे, पोनि, बेलवंडी पोलीस ठाणे

गुजरात येथील दोन तरुण लुटल्याची तक्रार देण्यासाठी सुपा पोलिस ठाण्यात आले होते. मात्र घडलेला प्रकार बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असल्याने त्यांना बेलवंडी पोलीस ठाण्यात पाठविले होते.
-सोमनाथ दिवटे, सपोनि. सुपा, पारनेर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!