घोडेगाव- परिवहन विभागाने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन) प्लेट अनिवार्य केली आहे. वाहनमालकांच्या सोयीसाठी अधिकृत एजन्सीमार्फत ही सेवा दिली जाते. मात्र, घोडेगाव येथील एका एजन्सीमध्ये अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याचा गंभीर आरोप वाहनमालकांकडून होत आहे.
याबाबत वाहनमालकांनी पत्रकारांना सांगितले, की नियमित दरानुसार दुचाकी वाहनासाठी ४५० रुपये आणि जीएसटी मिळून एकूण ५३१ रुपये इतकी रक्कम आकारली जाते. तशी अधिकृत पावतीही मिळते; मात्र येथे पावती न देता थेट ७०० रुपये वसूल केले जात आहेत, असा आरोप वाहनमालकांनी केला आहे.

म्हणजेच दर वाहनमालकाकडून १६९ रुपयांची जादा वसुली केली जात आहे. पावती मागितल्यावर प्रिंटर बिघडल्याचे कारण देत पावती देणे टाळले जाते. वाहनमालक आग्रह करतात, तेव्हा पावतीचा फक्त फोटो दाखवला जातो, ज्यावर रक्कम ५३१ रुपयेच असतात. मग उर्वरित रक्कम का घेतली गेली? असा सवाल उपस्थित होताच ‘फिटिंग व मेंटेनन्स चार्जेस’ असल्याचे सांगितले जाते.
परिवहन विभागाचे स्पष्ट निर्देश – आहेत की, अधिकृत एचएसआरपी सेंटरवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये. घरी किंवा सोसायटीमध्ये जाऊन सेवा दिल्यासच अतिरिक्त शुल्क आकारण्याची परवानगी आहे. मग घोडेगाव येथील या सेंटरवर ही जादा रकमेची वसुली कोणाच्या संमतीने केली जात आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या आर्थिक फसवणुकीकडे जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट फिटिंग सेंटरबाबत वाहनधारकांच्या अनेक तक्रारी आहेत. नेवासा तालुक्यात फक्त तीन सेंटर असून वाहन धारकांना वेळेवर प्लेट मिळत नाही. कित्येक वाहने आरटीओ कार्यालयाने ऑनलाईन केलेले नाहीत. तसेच या सेंटरवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.- संदिप गाडेकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, चालक-मालक संघटना