श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात बेकायदेशिरपणे रात्री ड्रोन व्दारे शुटींग घेणा-या व्यक्तिंचा शोध घ्या. ड्रोन यंत्रणेच्या विरोधात कराव्या लागणा-या कारवाईसाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री उपलब्ध करुन, या व्यक्तिंविरोधात कठोर कारवाई करा अशा सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.
राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यात रात्री उशिरा ड्रोनव्दारे घिरट्या घालून भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मागील आठवड्यापासून हे प्रकार सातत्याने सुरु असल्याने दोन्हीही तालुक्यातील ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून या प्रकाराबाबत तक्रारी केल्या होत्या. शिर्डीमध्ये विविध प्रश्नां संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस आधिका-यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत बेकायदेशिर ड्रोन वापराच्या संदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली.

याबाबत मंत्री विखे पाटील यांनी सर्व पोलिस आधिका-यांना ड्रोन यंत्रणेबाबत सतर्क राहून कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात. नेमक्या कोणत्या व्यक्तिंकडे ड्रोन आहेत याची माहीतीही संकलित करावी. ड्रोनचा वापर रात्रीच्याच वेळी केला जात असल्याबाबचे गांभिर्य लक्षात घेवून, विशेष यंत्रणा प्रशासनाने उभारावी अशा सुचना त्यांनी दिल्या.
रात्रीच्या वेळी ड्रोनचा वापर बेकायदेशिरपणे होत असेल तर, त्या विरोधात कोणती यंत्रणा कार्यान्वित करता येईल याचा अभ्यास करुन, यासाठी आवश्यक असलेल्या साधनांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची तयारी मंत्री विखे पाटील यांनी दर्शविली आहे.