मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडले ; टेल टू हेड आशा पद्धतीने मिळणार पाणी

Published on -

अहिल्यानगर : पाथर्डी, नगर, राहुरी, नेवासा तालुक्यांतील ४५ गावांमधील १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी योजनेला बुधवारी दुपारी तीन वाजता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुळा धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुळा धरणात बऱ्यापैकी पाण्याची साठवणूक झाली. मात्र, नगर राहुरी पाथर्डी तालुक्यामध्ये अनेक भागात पावसाने ओढ दिल्यामुळे या भागातील पिकांना पाण्याची मोठी गरज असल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली. आ. कर्डिले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली.

दोन दिवसात मुळा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले. बुधवारी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. या वेळी युवानेते अक्षय कर्डिले म्हणाले, वांबोरी चारीचे पाणी काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभधारक तलावापर्यंत पोहोचत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नाराजी होती. मिरी- तिसगावसह प्रत्येक लाभधारक तलावात पाणी पोहोचावे, यासाठीच आ. कर्डिले यांनी १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, टेल टू हेड पाणी सोडण्याच्या सूचना युवानेते अक्षय कर्डिले यांनी मुळा पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.

या वेळी मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गुळूमकर, उपअभियंता व्ही. डी. पाटील, शाखा अभियंता अमोल सातपुते, यांच्यासह मोठ्या संख्येने लाभधारक शेतकरी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मागणी करताच आ. शिवाजीराव कर्डिले यांनी मुळा धरणातून ओव्हर फ्लोचे पाणी सोडले असून, पहिली मोटरा सुरू केली असून, तीनही मोटारी सुस्थितीत आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तिनही मोटारी चालू करून लाभधारक पाझरतलावापर्यंत पाणी देण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे. टेल टू हेड पाणी देण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अशी माहिती अक्षय कर्डिले यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!