तांदुळवाडी- मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात अपेक्षेप्रमाणे पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उजव्या व डाव्या कालव्याला आज गुरुवारी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सध्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून मुळा धरणाचा साठा आता १८ हजार १५१ टीएमसी झाला असून काल बुधवारी मुळा नदी पात्रामध्ये ३ हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले. तसेच मुळा उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पाथर्डी-शेवगाव परिसरामध्ये तसेच डाव्या कालव्याखालील लाभक्षेत्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडत असून अनेक ठिकाणी पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून अनेकांची पिके पाण्यावर आली आहे.

त्यामुळे मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे उजवा व डाव्या कालवाला शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी विनंती केली
आणि ती तात्काळ मान्य करून पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिले असून त्यानुसार उजव्या व डाव्या कालव्याला आज गुरुवारी पाणी सोडण्यात येणार असल्याचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले आहे. या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जीवदान मिळणार आहे. अजून बहतांश भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पाण्यावाचून पिके जळू लागले, अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी रोटेशन सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती.