राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून मंगळवार दि. १५ रोजी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी पत्रकात दिली.
राहुरी तालुक्यातील निभेरे, तुळापूर, कानडगाव, गुहा, कणगर, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर, चिंचविहिरे, गणेगाव या परिसरात पाऊस कमी झाल्याने जिरायती भागात पिकांना पाण्याची गरज भासत आहे. राहुरी तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील वरील लाभार्थी भागात पाऊस कमी आहे.

त्यामुळे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी या लाभ क्षेत्रातील वरील गावांमधील शेतकऱ्यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. कर्डिले यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची विनंती केली.
त्याची दखल घेत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिले असून त्यानुसार मंगळवार दि.१५ रोजी निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सुटणार आहे, असे आ. कर्डिले यांनी सांगितले आहे.