Reverse Mortgage Loan: काय आहे रिव्हर्स मॉर्गेज लोन? भरावा लागत नाही कुठलाही EMI….वाचा माहिती

Published on -

Reverse Mortgage Loan:- बँक किंवा एनबीएफसी यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कर्ज दिले जाते. यामध्ये वाहन कर्जापासून तर पर्सनल लोन, होम लोन इत्यादींचा समावेश करता येईल. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा कर्जाचा प्रकार येतो व तो म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज लोन होय. हे एक वेगळ्या प्रकारचे लोन असून जे पेन्शनधारकांसाठी म्हणजेच वृद्धापकाळात अतिशय फायद्याचे ठरू शकते. यामध्ये ज्या व्यक्तींकडे स्वतःचे घर असते त्यांना बँक रिव्हर्स मॉर्गेज लोन देते व या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जाते. चला तर मग याच लोन विषयी आपण थोडक्यात माहिती बघू.

रिव्हर्स मॉर्गेज लोनचे वैशिष्ट्ये

हा एक कर्जाचा खास प्रकार असून याचा लाभ साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो. या कर्जाच्या प्रकारामध्ये ज्येष्ठ नागरिक हे स्वतःचे राहते घर बँकेकडे तारण ठेवून त्या माध्यमातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम किंवा एक रकमी रक्कम घेऊ शकतात व उतार वयात पैशांची अडचण असेल तर त्यापासून मुक्तता मिळवू शकतात. हे एक महत्त्वपूर्ण लोन असून यामध्ये कर्जदाराला घेतलेल्या कर्जाचा कुठल्याही प्रकारचा हप्ता भरावा लागत नाही. तसेच कर्जदाराला बँक कधीही घराच्या बाहेर काढत नाही व संपूर्ण आयुष्यभर कर्जदार त्या घरात राहू शकतो. फक्त कर्जदार आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तरच बँक घरावर ताबा मिळवू शकते.

कुणाला मिळू शकते हे लोन?

रिव्हर्स मॉर्गेज लोन हे साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मिळते व ज्यांच्या नावे स्वतःच्या नावाचे राहते घर आहे त्यांना या कर्जाचा फायदा मिळतो. घराचे बाजार मूल्य काय आहे त्यानुसार कर्जदाराला 35 ते 55 टक्के इतकी रक्कम कर्ज स्वरूपामध्ये देण्यात येते. वीस वर्षाच्या कालावधीसाठी हे लोन मिळू शकते. संबंधित कर्जदार जर वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी हयात राहिला तर कर्जदाराला पैसे मिळणे बंद होते. तर तो त्या घरात राहू शकतो. कर्जदाराची पत्नी/ पती जिवंत असेल तर त्याला देखील घरातून काढले जात नाही. या लोनचा व्याजदर हा 9.40% ते 10.95% इतका आहे. यावरून आपल्याला दिसून येते की इतर कर्जाच्या प्रकारापेक्षा या कर्जाचे व्याजदर हे थोडे जास्त आहेत. म्हणजे यामध्ये प्रत्येक पाच वर्षांनी घराचे नवीन मूल्यांकन केले जाते व त्यानुसार व्याजदर आणि रक्कम यात बदल होऊ शकतो. या लोनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर घरावर बँकेचा ताबा येतो आणि घर विकून बँक आपली रक्कम वसूल करते. परंतु संबंधित व्यक्तीचे वारसदार जर कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज परतफेड करून त्यांना घर परत मिळवायचे असेल तर ते मिळवू शकतात. तसेच घराच्या विक्रीतून आलेली रक्कम कर्जापेक्षा जास्त असेल तर उरलेली रक्कम घर मालकाच्या वारसांना परत मिळते. ज्येष्ठ नागरिकांना जर पेन्शन मिळत नसेल तर रिव्हर्स मॉर्गेज लोन हा खूप मोठा दिलासा ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe