राज्‍यातील सहकारी साखर कारखानदारी टिक‍विण्‍यासाठी जाणत्‍या राजांचे योगदान काय ? पालकमंत्री विखे पाटलांचा सवाल

Published on -

यापुर्वी सहकार चळवळीचा वापर फक्‍त दडपशाही आणि राजकीय स्‍वार्थासाठी झाला. सहकाराच्या नावाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ही संस्‍था सुध्‍दा काहींनी राजकीय अड्डा करुन ठेवली आहे. राज्‍यातील सहकारी साखर कारखानदारी टिक‍विण्‍यासाठी जाणत्‍या राजांचे योगदान काय? केवळ केंद्र सरकारच्‍या सहकारी धोरणामुळेच राज्यातील सहकारी साखर कारखाने टिकण्यात मोठी मदत होवू शकली असे प्रतिपादन राज्‍याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या अधिमंडळाची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झाली. या सभेस माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ.भास्‍करराव खर्डे, कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन सोपान शिरसाठ, बॅकेचे व्‍हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, मा.चेअरमन कैलास तांबे यांच्‍यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात राज्‍यातील सहकारी साखर कारखानदारीच्‍या वाटचालीचा आढावा घेवून अडचणीत आलेली सहकारी साखर कारखानदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थापन झालेल्‍या सहकार मंत्रालयामुळे टिकू शकली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या माध्‍यमातून यापुर्वी १२ हजार कोटी रुपयांचा माफ झालेला आयकर तसेच इथेनॉल संदर्भात घेतलेल्‍या धोरणामुळे कारखानदारीला मोठा लाभ झाला. केवळ घोषणा नाही तर, कृती केल्‍याने राज्‍यातील सहकारी साखर कारखाने टिकू शकले.

यापुर्वी कारखान्‍यांच्‍या प्रश्‍नांबाबत केवळ शिष्‍टमंडळा नेली जात होती, निर्णय कुठले होत नव्‍हते. राज्‍यातील साखर कारखान्‍यांना मार्गदर्शन करण्‍याची जबाबदारी ज्‍या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटवर आहे ती संस्था फक्‍त जाणत्‍या राजांनी प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी करुन, राजकीय अड्डा करुन ठेवला असल्‍याचा थेट आरोप त्‍यांनी आपल्‍या भाषणात केला. उसाच्‍या क्षेत्रात कुठलेही संशोधन नाही, बदलत्‍या युगात असलेले तंत्रज्ञान सुध्‍दा कारखान्‍यांना ते सांगू शकले नाहीत, हार्वेस्‍टर सुध्‍दा कारखान्‍यांना बाहेरुन घ्‍यावे लागले. मग सहकारी साखर कारखानदारी मध्‍ये जाणत्‍या राजांचे योगदान तरी काय असा सवाल करुन, यापुर्वी सहकार चळवळीचा वापर फक्‍त राजकीय दडपशाहीसाठी केला गेल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

राज्‍य दुष्‍काळमुक्त करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या माध्‍यमातून यशस्‍वी प्रयत्‍न सुरु आहेत. नदीजोड प्रकल्‍पासाठी ६० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन, त्‍याचे सर्वेक्षण सुरु करण्‍यात आले असून, २०२६ पर्यंत त्‍याचा प्रारुप आराखडा तयार होईल असे स्‍पष्‍ट करुन, ना.विखे पाटील म्‍हणाले की, २००५ साली समन्‍यायी पाणी वाटप कायद्याचे भूत स्‍वत:ला जलनायक म्‍हणणा-यांनी जाणीवपुर्वक जिल्‍ह्याच्‍या मानगुटीवर बसविले आणि त्‍याला जाणत्‍या राजांच्‍या पिलावळींनी साथ दिली. मात्र आता जायकवाडीला जिल्‍ह्यातून पाणी सोडण्‍याची गरज नाही. आपल्‍या जिल्‍ह्यातील पाणी सुरक्षित राहण्‍यासाठी जायकवाडीसह जिल्‍ह्यातील धरणांचे नियोजन केले आहे.

यापुर्वी निळवंडे प्रकल्‍पावरुन केवळ विखे पाटील परिवाराची बदनामी केली गेली. परंतू निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यातून पाणी देण्‍याचे काम विखे पाटील परिवाराच्‍या माध्‍यमातूनच होवू शकले. निळवंडे कालव्‍यांचे नियोजनही योग्‍य झाल्‍यामुळे स्‍वप्‍नात सुध्‍दा वाटले नव्‍हते अशा गावात पाणी पोहोचले. कारखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रातील ३ केटीवेअरचे रुपांतर व्‍हर्टीकल बॅरेजमध्‍ये करुन पाण्‍याची गळती थांबविण्‍याचा आपला प्रयत्‍न असून, प्रवरा डाव्‍या व उजव्‍या कालव्‍याच्‍या नूतणीकरणासाठी १९० कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिला. पाण्‍याच्‍या बाबतीत यापुर्वी जिल्‍ह्यावर मोठ्या प्रमाणात अन्‍याय झाला. आता न्‍याय मिळवून देण्‍याची जबाबदारी आपली आहे.

कारखान्‍याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्‍याने केंद्र सरकारच्‍या सहकार्याने १० हजार टन गाळप क्षमतेचा नवीन प्रकल्‍प कार्यान्वित केला असून, त्‍याचे लोकार्पण केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या शुभहस्‍ते आणि मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली ५ ऑक्‍टोंबर २०२५ रोजी होणार असून, लोणी बुद्रूक येथील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही होणार असल्‍याचे सांगितले.

कोट – राज्‍यात निर्माण झालेल्‍या नैसर्गिक संकटाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रवरा उद्योग समुहाच्‍या वतीने मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रुपये देण्‍याची घोषणा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News