ज्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात रावणाचे विचार पेरण्याचे काम सुरू होते तिथे आज वारकरी मंडळी प्रभू राम यांचा विचार पेरत असून आदिवासी, गरीब लोकांचे धर्मांतर हे देखील एक आव्हान होते त्या घटनांना वेळीच अटकाव घातल्याने हे संकट तालुक्याने परतवून लावले त्याचा मला अभिमान वाटतो, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी आमदार डॉ. किरण लहामटे मित्र परिवाराच्यावतीने अध्यात्म क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकारांना वारकरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अगस्ती आश्रम येथे या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा हा पुरस्कार आदिवासी समाजाचे भूषण ह.भ.प. देवराम महाराज ईदे यांना प्रदान करऱ्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, देऊन आ. डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी सुनील महाराज मंगळापूरकर यांचे कीर्तन पार पडले.

व्यासपीठावर केशव बाबा चौधरी, अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ , रामनाथ महाराज जाधव, दीपक महाराज देशमुख, संकेत महाराज आरोटे, दत्तात्रय लांघी, चंद्रकांत महाराज चौधरी, नारायण महाराज जोंधळे, अरुण महाराज शिर्के, संदीप महाराज सावंत, नारायण महाराज जोंधळे, इंद्रभन महाराज कोल्हाळ, कुणाल बांबळे, गणेश महाराज वाकचौरे उपस्थित होते. आमदार डॉ किरण लहामटे म्हणाले, अकोले तालुक्यात दारूला राजाश्रय बंद केला आहे. आज सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय विश्रामगृहावर, नर्सरीमध्ये दारू पार्त्या बंद केल्यात.
जशी प्रजा तसा राजा या प्रमाणे आपण चोवीस तास लोकांमध्ये असतो. तालुक्यात जाती पातीचे राजकारण कधी नव्हते या पुढे असणार नाही. अकोले तालुक्याचे जनतेने माझ्यावर खुप प्रेम केले. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्यांच्या सेवेत कायम राहील.
अकोले तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतीना पूर्वी आपण बक्षिसे दिली त्याच धर्तीवर आता जी गावे निर्व्यसनी होतील ती गावे विकासासाठी आपण दत्तक घेणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात आ. डॉ किरण लहामटे यांनी केली. त्यांच्या या घोषणेचे अनेक गावांनी स्वागत केले आहे.