श्रीरामपूर- शहरात सध्या मुल्ला कटर अत्याचार प्रकरणामुळे तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्यावर साक्षीदार महिलेला धमकी दिल्याचा आरोप करत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे. त्यांनी हा गुन्हा राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात सत्य बाहेर यावे यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला भेटून तपासाची मागणी केली आहे. यासोबतच चुकीची कारवाई झाल्यास श्रीरामपूर बंदचा इशारा देण्यात आला आहे.
मुल्ला कटर अत्याचार प्रकरणात एका महिलने सेशन कोर्ट, श्रीरामपूर येथे साक्ष दिली आहे. या साक्षीच्या संदर्भात प्रकाश चित्ते यांच्यावर आणि मुल्ला कटरच्या भावासह इतरांवर भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलेला धमकी देऊन तिला मुल्ला कटरच्या विरोधात साक्ष न देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तपास करत आहेत. मात्र, सुनील मुथा आणि त्यांच्या शिष्टमंडळाने हा गुन्हा खोटा असून राजकीय हेतूने दाखल केल्याचा आरोप केला आहे.

सुनील मुथा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सिद्धार्थ मुरकुटे, संतोष कांबळे, राजेंद्र सोनवणे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सहभागी होते. त्यांनी या प्रकरणात सखोल तपासाची मागणी केली आणि प्रकाश चित्ते यांच्यावरील गुन्हा खोटा असल्याचा दावा केला. सुनील मुथा यांनी सांगितले की, हा गुन्हा प्रकाश चित्ते यांची राजकीय प्रतिमा डागाळण्यासाठी रचलेल्या कटाचा भाग आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला राजकीय दबावाला बळी न पडता सत्य बाहेर आणण्याचे आवाहन केले.
सुनील मुथा यांनी या प्रकरणाला नियोजनबद्ध राजकीय षड्यंत्र संबोधले आहे. त्यांच्या मते, विरोधकांनी प्रकाश चित्ते यांना लक्ष्य करून त्यांची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही श्रीरामपूरमध्ये अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले असून, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी योग्य तपास करून असे प्रयत्न हाणून पाडले आहेत. या प्रकरणातही असाच काहीसा प्रकार घडत असल्याचा दावा शिष्टमंडळाने केला आहे. शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणात चुकीची कारवाई झाली, तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल. यासोबतच, प्रसंगी श्रीरामपूर बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.