अहिल्यानगर- जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहेत. ठेकेदार कंपनीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले आहे.
महाराष्ट्र राज्य १०८ रुग्णवाहिका चालक युनियनच्या न्याय मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यभरातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी दि. १ जुलै रोजी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चालकही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होते. या चालकांनी वेळोवेळी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध राज्य सरकारकडे तसेच सेवा पुरवठादार कंपन्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी १ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. चालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये समान काम समान वेतन तत्त्वानुसार वेतन व भत्त्यांची अंमलबजावणी, कुशल कामगार म्हणून वेतनश्रेणी लागू करणे, आठ तासांहून अधिक कामाबाबत दुप्पट मोबदला देणे, सर्व कायदेशीर रजा व त्यांचे वेतन देणे, कॅशलेस आरोग्य विमा सुविधा, वार्षिक बोनस, वाहन धुलाई भत्ता, दर महिन्याच्या दहाव्यापूर्वी वेतन अदा करणे, पाच वर्षानंतर ग्रॅज्युटी देणे आणि विविध भत्ते यांचा समावेश आहे.
या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर ठेकेदार कंपनी बीव्हीजी इंडिया लिमिटेडने पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. तसे पत्र कंपनीकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.