पाथर्डी- मानवी जीवनात खेळाचे विशेष महत्व आहे. खेळामुळे न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. मोबाईल व सोशलमिडीयाच्या आहारी न जाता प्रत्येकाने किमान एका खेळात प्राविण्य मिळविल्यास खेळातूनही चांगले करियर घडू शकते. किमान आपल्या प्रतिभा शक्तीचा विकास होण्यासाठी तरी प्रत्येकाने खेळले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय मा. आ. स्व. बाबुजी बाबुजी आव्हाड स्पोर्टस लीग उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ – विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड होते. व्यासपीठावर मा. नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, विश्वस्त नंदुशेठ शेळके, बाळासाहेब कचरे, प्राचार्य डॉ. बबन चौरे, धनंजय बडे, बंडूशेठ बोरुडे, सोमनाथ अकोलकर उपस्थित होते.

आ. मोनिकाताई राजळे – म्हणाल्या, पार्थ विद्या प्रसारक मंडळ यावर्षी हीरकमहोत्सव साजरे करत असून, संस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. बाबूजींचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले असून, पाथर्डी तालुक्यात शैक्षणिक क्रांती करण्याचे काम बाबुजींनी केले. दिवसेंदिवस संस्थेची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता वाढत असून, कोमल वाकळे, योगिता खेडकर, हर्षदा गरुड आदी महाविद्यालयाच्या खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत.
क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणून आज भारत सरकार खेलो इंडिया, कब्बडी लीग, आयपीएल यासारख्या स्पर्धांना प्रोत्साहन देत असून, यातून अनेक ग्रामीण खेळाडू पुढे येत आहेत. पाथर्डीच्या पंकज शिरसाट यांनी कब्बडी खेळात भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. या वेळी पाथर्डी तालुका क्रीडा समितीमध्ये अध्यक्षपदी निवड झालेल्या राजेंद्र शिरसाट, सचिव आजिनाथ शिरसाट, सहसचिव एकनाथ पालवे, खजिनदार रामदास दहिफळे व इतर सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
स्पोर्ट लीगमध्ये पाथर्डी तालुक्यातील विविध विद्यालयांतील १५२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पोर्ट यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख, सचिन शिरसाट, रावसाहेब मोरकर, प्रमोद हंडाळ, सतीश डोळे, ज्ञानेश्वर गायके यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी केले. सूत्रसंचालन शेखर ससाणे तर आभार डॉ. विजय देशमुख यांनी मानले.