ठेकेदाराने खंडणी न दिल्यामुळे तरूणांनी कोपरगाव तालुक्यातील उड्डाणपुलाचे काम पाडले बंद, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

Published on -

कोपरगाव- सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्याच्या कामाने अद्यापही वेग न घेतल्याने खड्ड्यांचा त्रास संपता संपेना, त्यात भरीस भर म्हणून कोपरगावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रस्त्याचा ठेका घेतलेल्या कंत्राटदाराने खंडणी न दिल्याने काही तरुणांनी पुणतांबा चौफुली येथील उड्डाण पुलाचे काम बंद पाडले आहे.

खंडणी मागणाऱ्या तरुणांनी कोणाचे नाव न घेतल्याने या प्रकारात वेगवेगळ्या नावांच्या आता कोपरगाव शहरात चर्चा रंगू लागल्यात. काहींनी जुन्या प्रकरणांचे दाखले देऊन हा तोच असेल, असे अंदाज वर्तवले आहेत. या चर्चेमुळे कोपरगाव शहरातील राजकीय वातावरण ढवळल्याने गढूळ बनले आहे.

जुना नागपूर-मुंबई व नगर-मनमाड या महामार्गावरील पुणतांबा चौफुली असल्याने या ठिकाणी उड्डाण पूल प्रस्तावित आहे. काम तातडीने व्हावे, यासाठी ठेकेदाराने उड्डाण पुलाच्या कामासाठी स्टीलची बांधणी केली होती. मात्र बांधणी केलेले स्टील काढून घेण्यात आल्यामुळे या पुलाचे काम खंडणी मागण्याच्या प्रकारावरून बंद पडले अशी चर्चा आहे.

मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक या मार्गाने असते. परंतु रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. दुसरीकडे या मार्गावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडले असल्याने नागरिकांच्या त्रासात दिवसेंदिवस भर पडत आहे. कंत्राटदारावर मोठा दबाव असल्याने हे काम तातडीने व्हावे, यासाठी तो प्रयत्नरत आहे.

मात्र, कंत्राटदाराकडे काही तरुणांनी तू खंडणी का दिली नाही? असे म्हणत हे काम बंद पाडले. खंडणी मिळेपर्यंत काम करू नको असे बजावले असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. दरम्यान, या चर्चेच्या आधारे आमच्या प्रतिनिधीने संबंधिताशी संपर्क साधला असता, त्यांनी चक्क कानावर हात ठेवून, स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

कंत्राटदाराने पर्यायी रस्ता न करता थेट पुलाचे काम चालू केले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती ही बाब लक्षात आल्याने ठेकेदाराला आधी पर्यायी रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले व हा रस्ता ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
– अभिमन्यू जमाले, सहा, अभियता, राष्ट्रीय महामार्ग

आम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रास झालेला नाही किंवा कोणीही पैसे मागितलेले नाही किंवा कोणाच्या सांगण्यावरून आम्ही स्टील काढून घेतलेले नाही तर वाहतूक कोंडी होत असल्याने महामार्ग विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे आम्ही येथील बांधलेले स्टील काढून नेले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!