अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली.
यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपये किंमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात 2 जणांना अटक करण्यात आली आहे.
2 जण फरार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर विभागाच्या निरीक्षक, भरारी पथक क्रमांक 2 यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी वेल्हाळे शिवारातील हॉटेल हरीबाबा जम्मू-पंजाब चौधरी ढाब्याच्या मोकळ्या जागेत वाहतूक टँकरमधून स्पिरीट (मद्यार्क) तस्करी केली जाणार आहे.
याबाबत पथकाने प्रत्यक्ष सापळा रचून तपासणी केली असता 4 व्यक्ती बेकायदेशीर रित्या स्पिरीट काढतांना आढळून आले. याठिकाणी छापा टाकण्यात आला असता शहाजहान अफसर खान (वय-38, रा.उत्तरप्रदेश) व जुगल कुमार मंगुराम (वय-23, रा.जम्मू काश्मीर) यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्या 1949चे कलम 65 (अ) (ई), 80 (1), 81,83,90,98 (22) अन्वये 2 जणांना अटक करून व 2 जणांना फरार घोषित करून त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईत प्रत्येक टँकरमध्ये अंदाजे 34 हजार 600 लिटर स्पिरीट (मद्यार्क) असलेले 3 टँकर, 200 लिटरचे 5 बॅरल व सामग्री असे एकूण 1 कोटी 43 लाख 83 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक उषा वर्मा, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपाल चांदेकर,
अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक पी.बी.आहिरराव, के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक के.यु.छत्रे, व्ही.जी.सुर्यवंशी, के.के.शेख, एस.आर.वाघ तसेच प्रवीण साळवे, दीपक बर्डे, व्ही.आर.करपे,
टी.आर.शेख,सचिन गुंजाळ, एस.एम.कासुळे, स्वाती फटांगरे यांनी सदर कारवाई केली. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास निरीक्षक गोपाल चांदेकर करत आहेत. अशी माहिती निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.