Ahmednagar News : यंदाचा ऊस गळित हंगाम अंतिम टप्प्यात असून राहुरी तालुक्यातील जवळपास १० लाख मेट्रिक टन उसाचे राहुरीतील खासगी कारखान्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला आहे.
दिवाळीनंतर सुरू झालेल्या हंगामत सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले. हंगाम जिल्ह्यातील २२ साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू राहिले. यात १३ सहकारी तर नऊ खासगी साखर कारखान्यांचा समावेश राहिला.
राहुरी तालुक्यात यंदा उसाचे उत्पादन १० लाख मेट्रिक टनांहून अधिक झाले होते. तालुक्यातील एकमेव खासगी प्रसाद शुगर्सने आज अखेर ५ लाख ५५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, तर ५ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
प्रसाद शुगर कारखान्याचा सरासरी साखर उतारा ९.८५% इतका असून सध्या प्रसाद शुगर्स कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे.
राहुरी तालुक्यातील जवळपास १० लाख मेट्रिक टन ऊस विविध साखर कारखान्यांनी आपापल्या कारखान्यात तोडून गाळप केला आहे. यंदाच्या वर्षी अशोक, संगमनेर, प्रवरा, मुळा व अन्य साखर कारखान्यांनी राहुरी येथील ऊस नेला आहे.
अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना २७०० रुपयांपर्यंत पहिला हप्ता दिलेला आहे. मागील वर्षी झालेल्या बऱ्यापैकी पावसाने उसाचे उत्पादन चांगले झाले होते. यंदाच्या वर्षी उसाच्या शेतीला कालव्यांचे आवर्तन कमी प्रमाणात मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत,
असे असताना यावर्षी २०२४ मध्ये विविध हवामान विभागाकडून चांगल्या पावसाचे संकेत येत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.