सोसायटी निकालानंतर युवकाचा खून करून पळालेले 10 जण 12 तासात पकडले; पोलिसांचा थरारक पाठलाग

Ahmednagar News : देवराई (ता. पाथर्डी) येथील सोसायटी निवडणुकीतील वादातून अजय गोरक्ष पालवे या युवकाचा खून झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.

खून झाल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यातील 10 जणांना 12 तासांच्या आत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, पाथर्डी व शेवगाव पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पाथर्डी पोलिसांनी सुनील एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे यांना शिताफीने पकडले. गुन्ह्यातील इतर आरोपी त्यांच्या वाहनातून पळून जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी त्यांच्या पथकासोबत तसेच पाथर्डीचे निरीक्षक सुहास चव्हाण यांनी त्यांच्या पथकासोबत दीड ते दोन तास वाहनाचा थरारक पाठलाग केला.

नेवासा पोलिसांच्या पथकाने सदर वाहन नेवासा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान अडवून ताब्यात घेतली व संजय विष्णु कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे यांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेने अक्षय संभाजी पालवे याला ताब्यात घेतले.