Ahmednagar Mahanagarpalika Bharti : महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.
आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. गेल्या सहा ते सात वर्षात अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सर्वच विभागांत मनुष्यबळाची कमतरता आहे.
एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांचा पदभार आहे. त्यामुळे अनेक कामे रखडून नागरिकांचीही गैरसोय होते. मनपात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शासनाकडे किमान आवश्यक ती पदे भरती करण्यास मंजुरी द्यावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
मंजूर पदे २८७० कार्यरत अवघे १६००
मनपाच्या आकृतिबंधात मंजूर पदे २८७० इतकी आहेत. प्रत्यक्षात कार्यरत अवघे १६०० आहेत. आता नव्याने भरती करण्यात येणाच्या पदांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, भूजलतज्ज्ञ, पर्यावरण संवर्धन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहायक, आरेखक, संगणक प्रोग्रॅमर, विद्युत पर्यवेक्षक, पाणी लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघु टंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाजविकास अधिकारी, सॅनिटरी सबइन्स्पेक्टर, फायरमन, लिपिक, टंकलेखक आदी संवर्गातील पदे भरली जाणार आहेत.