पारनेर तालुक्यातील १४ गावांना पाणी टंचाईच्या झळा, टँकरसाठी गावांचे मागणी अर्ज

Published on -

पारनेर: उन्हाळा जवळ येताच पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, सारोळा आडवाईसह १४ गावांना पाण्याच्या टंचाईचा त्रास भोगावा लागतोय. या गावांनी टंचाईचे प्रस्ताव सादर करताच गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन उद्भवांची पाहणी केली.

त्यांनी शासनाकडे तातडीनं अहवाल पाठवला आहे. तहसील आणि पंचायत समितीकडे टँकरची मागणी करणारे अर्जही दाखल झालेत.

पारनेर तालुक्यातील अनेक गावांत पाणी पुरवठा करणारे उद्भव आटलेत. विहिरी, कूपनलिकांत पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. गावागावांत पाण्यासाठी चिंता वाढतेय.

तालुक्यातील पठारावर दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यातच पाणीटंचाई डोकं वर काढते. कान्हूर पठार, पिंपरी पठार, पिंपळगाव रोठा, पुणेवाडी, वेसदरे, विरोली, कारेगाव, रांजणगाव मशीद, सारोळा आडवाई, करंदी, पळसपूर, मुंगशी, पळशी आणि म्हसोबा झाप या १४ गावांनी टँकरसाठी अर्ज केलेत.

गटविकास अधिकारी दयानंद पवार या गावांना भेटी देत उद्भव आणि टंचाईची पडताळणी करतायत. त्यानुसार प्रस्तावांना मंजुरी मिळणार आहे. कान्हूर पठारासह सोळा गावांच्या नव्या पाणी पुरवठा योजनेचं काम सध्या थांबलंय.

इतर गावांतही विहिरी, तलावांमधलं पाणी आटल्यानं टंचाई वाढतेय. याचा फटका पिकांनाही बसतोय.

पळसपूर, चिंचोली, म्हसोबा झाप, मुंगशी या गावांत जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आणि कामही पूर्ण झालं.

पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनं योजना पूर्ण झाल्याचा दाखला देऊनही पहिल्याच वर्षी या चार गावांत पाणीटंचाई जाणवतेय. यामुळे या योजनेची पोलं उघडी पडलीत.

टँकरची मागणी करणाऱ्या गावांमधील उद्भवांची पाहणी होईल. तहसील आणि पंचायत समितीचा एकत्रित अहवाल आल्यानंतर टँकरच्या प्रस्तावांना तातडीनं मंजुरी दिली जाईल, असं तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी सांगितलं.

टँकरसाठीचे अर्ज पंचायत समितीकडे आलेत. त्यानुसार गावांची टंचाई पाहून प्रस्तावांना मंजुरी देणार असल्याचं गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी सांगितलं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe