अहिल्यानगर- सौरऊर्जेच्या वापरातून पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्ण ऊर्जानिर्मितीचा मार्ग अखेर सर्वसामान्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि कुसुम योजना यांच्याअंतर्गत हजारो घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले असून, यामधून महिन्याकाठी तब्बल १५.८ मेगावॅट वीज तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊर्जेची गरज भागवण्यास मोठा हातभार लागतो आहे.
४,६२२ घरांवर सौरऊर्जा
जिल्ह्यातील ४,६२२ ग्राहकांनी आपल्या घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटला ३०,००० रुपये, दोन किलोवॅटला ६०,००० रुपये, आणि तीन किलोवॅटला ७८,००० रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाते.

महावितरणकडून या प्रकल्पांसाठी नेट मीटर मोफत दिले जात आहेत. या नेट मीटरच्या मदतीने ग्राहक घरी वापरलेली वीज आणि महावितरणकडे विकलेली अतिरिक्त वीज याचा सविस्तर तपशील पाहू शकतात.
विज बील शून्यावर
घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौर प्रकल्पांमधून निर्माण झाली, तर ती वीज थेट महावितरणकडे विकली जाऊ शकते. त्यामुळे अनेक कुटुंबांचे वीजबील शून्यावर येत असून, त्यांना महिन्याला उत्पन्नही मिळू लागले आहे.ही योजना ऊर्जा स्वावलंबनाकडे एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
शेतीसाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रधानमंत्री कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. जिल्ह्यात ५,५४३ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत प्रकल्पाच्या एकूण खर्चाचा ६०% अनुदान, ३०% कर्ज आणि केवळ १०% स्वतःचा हिस्सा अशा स्वरूपात आर्थिक मदत मिळते. परिणामी, शेतकऱ्यांना स्वस्तात सौर पंप बसवता येतो आणि त्यातून निर्माण होणारी वीज विकून उत्पन्न वाढवता येते.
सौर नेट मीटर मोफत
पूर्वी नेट मीटरचा खर्च ग्राहकाला स्वतः करावा लागत होता. मात्र आता महावितरणने सोलर नेट मीटर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना केवळ आर्थिक लाभ नव्हे, तर वीजनिर्मिती, वापर व अतिरिक्त वीज विक्री याची दररोज मोबाइलवर माहिती मिळते,
जे त्यांना ऊर्जा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि नियोजनक्षमतेचा फायदा देते.‘सूर्यघर’ व ‘कुसुम’ योजनांमुळे जिल्ह्यात ऊर्जेच्या गरजांवर पर्यायी आणि शाश्वत उपाय उपलब्ध झाले आहेत.