अहमदनगर जिल्ह्यातून १७५ जण हद्दपार ?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे पाचशे व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. यातील सुमारे १७५ जणांना शहरातून तात्पुरत्या काळासाठी शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. काही जणांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे.

उत्सव काळात गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी त्यादृष्टीकोनातून नियोजन सुरू केले आहेत. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील १५५ व्यक्तींना सीआरपीसी १०७ प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहे.

यामध्ये कोतवाली ५३, तोफखाना ६२ व भिंगार कॅम्प हद्दीतील ४० व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या २४ गुन्हेगारांना सीआरपीसी ११० प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहेत.

त्यांच्याकडूनही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहेत. यामध्ये तोफखाना हद्दीतील २२ व भिंगार हद्दीतील २ गुन्हेगारांचा समावेश आहे.गैरवर्तन करण्याची शक्यता असणाऱ्या १२७ व्यक्तींना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस देण्यात येणार आहेत.

यामध्ये कोतवाली हद्दीतील २२, तोफखाना हद्दीतील ४५ तर भिंगार हद्दीतील ५० व्यक्तींचा समावेश आहे. मोहरम काळात गैरवर्तन केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक कातकडे यांनी सांगितले.

मोहरम मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नगर शहर हद्दीतून १७५ व्यक्तींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यांना सीआरपीसी १४४ (२) प्रमाणे नोटीस बजावण्यात येणार आहे.

त्यांना मोहरम मिरवणूकीच्या वेळी हद्दीतून हद्दपार करण्यात येणार आहे. यामध्ये कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतून ५०, तोफखाना पोलिस ठाणे हद्दीतून ४५ तर भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतून ८० व्यक्तींना हद्दपार केले जाण्याची तयारी सुरू आहे. त्यांना लवकरच नोटीस देवून प्रतिबंधक कारवाई केली जाईल, असे उपअधीक्षक कातकडे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe