राहुरी: राहुरीत बुवासिंद बाबा तालीम परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांची चौकशी पूर्ण झाली आहे. याशिवाय १०५ जणांची चौकशी करायची बाकी आहे.
राहुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय आरोपींवर कारवाई करणं शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी जर काही माहिती किंवा पुरावे असतील, तर ते पोलिसांना द्यावेत, असं आवाहन राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुरीत पोलिस, महसूल प्रशासन आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक झाली.
या बैठकीला तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, शिवसेनेचे देवेंद्र लांबे, उबाठाचे सचिन म्हसे, हर्ष तनपुरे, नंदकुमार तनपुरे, सुरज शिंदे, सोन्याबापू जगधने, प्रकाश शेलार, निलेश जगधने, आयुब पठाण, बाळासाहेब उंडे, राजेंद्र उंडे, गणेश खैरे, सौरभ उंडे, अमोल भनगडे, सूर्यकांत भुजाडी, सुनील पवार, संतोष आघाव, विलास साळवे, अरुण साळवे, संजय साळवे, उमेश शेळके, कांता तनपुरे, संदीप राऊत आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक ठेंगे म्हणाले, “या घटनेनंतरही राहुरीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, याबद्दल राहुरीकरांचं मनापासून कौतुक करतो. गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सण शांततेत आणि आनंदात साजरे झाले.
पण तरीही या प्रकरणात तांत्रिक पुराव्यांशिवाय पोलिसांना ठोस पाऊल उचलता येत नाही. म्हणूनच नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही लावावेत आणि काही माहिती किंवा फुटेज असल्यास ते पोलिसांना द्यावं.”
शिवसेनेचे देवेंद्र लांबे यांनी सांगितलं, “राहुरीत सगळ्या जाती-धर्मांचे लोक आनंदाने राहतात. पण काही समाजकंटकांनी छत्रपतींची विटंबना केली, हे अत्यंत निंदनीय आहे.
आठवडा उलटला तरी आरोपी सापडले नाहीत, हे पोलिसांचं अपयश आहे. नाहीतर राहुरीत आम्ही स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहोत. ज्यांना अजून मिशा फुटल्या नाहीत, ते बाहेरून येऊन आम्हाला शिकवणार का?”
आरपीआयचे नेते अरुण साळवे म्हणाले, “शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.
प्रशासनाला सगळं माहिती आहे, तरीही त्यांनी तात्काळ कारवाई करावी.” आयुब पठाण यांनी मांडलं, “ही घटना दुर्दैवी आहे. राहुरी हा शांत तालुका आहे. पण बाहेरून येणारे लोक वक्तव्यं करून इथली शांतता भंग करतात.”
विलास साळवे, निलेश जगधने, सुरज शिंदे यांनीही आपली मतं मांडली आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली.