महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मागे आंदोलने होऊनही आरक्षण विषय मार्गी अद्यापही लागलेला नाही. यासाठी आता मराठा समाज पुन्हा आक्रमक होत मुंबई पर्यंत पदयात्रा काढणार आहे. तेथे मराठा समाज आंदोलनास बसणार आहे. दरम्यान या पदयात्रेचे आयोजन सध्या सुरू असून प्रशासकीय पातळीवरही याचे नियोजन सुरु आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरु केले असून प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर पोलिस तैनात केले जाणार आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी तोफखाना पोलिस ठाण्यात मराठा बांधव व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक होऊन पदयात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
२० जानेवारीला अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा बीड-गेवराई मार्गे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश होईल. या पदयात्रेत २५ लाख मराठा बांधव सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला असून नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील स्वयंसेवक मदतीसाठी शहरात येणार आहेत.
मराठा बांधवांसाठी पिण्याचे पाणी, भोजन आणि मुक्काची व्यवस्था करण्यात येत आहे. नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी परिसरातील मोकळ्या जागेत मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी लाईट, पिण्याचे पाणी, आदी सुविधाही मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणार आहेत, असे मराठा बांधवांकडून सांगण्यात आले.
असे असणार आहे नियोजन
प्रत्येक पाच किलोमीटरवर पोलिस तैनात
पदयात्रेच्या मार्गावर रुग्णवाहिका
मराठा स्वयंसेवकांची नेमणूक
पदयात्रेच्या दोन्ही बाजूने स्वयंसेवक उभे राहणार
पेट्रोलपंप १४ तास सुरू ठेवण्याची मागणी
स्वयंसेवकांसाठी वॉकीटॉकीची व्यवस्था
रस्त्यांच्या बाजूला ट्रॅक्टरमधून भोजनाच्या पॅकेटचे वाटप